‘भाग्य दिले तू मला’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता विवेक सांगळे आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राज-कावेरीच्या जोडीने अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली. यामध्ये निवेदिता सराफ यांनी रत्नमाला मोहिते म्हणजे कावेरीच्या सासूची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला प्रेक्षकांची पसंती, अवघ्या २ महिन्यांत दिली आनंदाची बातमी
नवऱ्याच्या निधनानंतर रत्नामाला मोहिते मोठ्या कष्टाने नवा व्यवसाय सुरू करून आयुष्याची एक नवी सुरूवात करतात. ‘माहेरचा चहा’ या त्यांच्या कंपनीला वेगळी ओळख मिळवून देण्यात रत्नमाला मोहितेंचा मोठा हातभार आहे. अनेक संकटं आली तरीही मोहिते कुटुंब एकमेकांची साथ कधीही सोडत नाही असं मालिकेच्या आजवरच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे.
हेही वाचा : Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या नव्या घराची पहिली झलक आली समोर, ‘असं’ असेल आलिशान घर
आता लवकरच या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. रत्नमालाचा नवरा आणि राजचे बाबा जिवंत असल्याचं सत्य मोहिते कुटुंबीयांसमोर येणार आहे. प्रवासादरम्यान राजच्या गाडीसमोर एक व्यक्ती अचानक आडवी येते. या अपघातामध्ये रत्नमाला आणि तिच्या नवऱ्याची भेट होणार असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रत्नमाला या प्रोमोमध्ये “अनिरुद्ध…” अशी हाक मारताना दिसते.
‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी अनिरुद्ध मोहिते यांची भूमिका साकारणार आहेत. लवकरच मालिकेत त्यांची एन्ट्री होईल. कलर्स वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेत तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ, अमित रेखी, पूर्वा फडके, जान्हनी किल्लेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते.