आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजेच भारत गणेशपुरे. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांनी १० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नंतर ते ‘शिवा’ या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते.
सोमवारी (१३ मे) वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने बऱ्याच ठिकाणी जीवघेणे प्रसंग घडले. मुंबईतील घाटकोपर येथे १०० फुटांचे एक मोठे होर्डिंग कोसळल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला, तर ६४ लोक जखमी झाले. या जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेत अनेक निरपराध लोकांचा बळी गेला. या घटनेबाबत भारत गणेशपुरे यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा… लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऋता दुर्गुळेने शेअर केली पती प्रतीकसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू जसा…”
हंच मीडियाच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा भारत गणेशपुरे यांना सोशल मीडियाच्या जगात होर्डिंग असणं गरजेचं आहे का, असं विचारलं असता भारत गणेशपुरे म्हणाले, “होर्डिंग असावेत, पण त्यांची साईज मुळात लक्षात घेतली पाहिजे. लहानपणी आणि कॉलेजच्या वेळेस आम्ही बॅनर लावायचो तेव्हा आम्ही त्या बॅनरमध्ये छिद्र करायचो, म्हणजे जर वारा आला तर त्यामधून तो गेला पाहिजे.”
“जर होर्डिंगची साईज कमी केली आणि जर त्या होर्डिंगमध्ये छिद्र केले तर त्यातून वारा निघून जाईल. आजकाल होर्डिंग जाहिराती इतक्या जास्त झालेल्या आहेत की, जो येतो तो उठसूट जाहिराती करतोय. मग त्या राजकीय असतील, काही प्रोडक्ट्सच्या असतील, सिनेमाच्या असतील, वेब सीरिजच्या असतील. मुंबई शहरात जगोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले जातात. त्याचं मूळ कारण असं आहे की, येता जाता ते दिसतं म्हणून मोठ्या प्रमाणात ते नजरेत भरतं. त्यामुळे त्याची काळजी घेऊनच ते केलं पाहिजे, नाहीतर ते करू नये, असं मला वाटतं.”
“आता जो अपघात झाला तो खूप विचित्र होता आणि अक्षरशः निरपराध अशा लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे. जेव्हा एक माणूस मरतो, तेव्हा त्याच्या कुटुंबातले पाच ते सहा जण हे वेठीस धरले जातात. त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. सरकारने कितीही मदत केली किंवा काहीही केलं, तरी तो जो माणूस गेलेला असतो तो परत येत नाही; त्यामुळे माझी जाहिरात एजन्सीला विनंती आहे की, त्याची साईज वगैरे बघूनच काम केलं पाहिजे.”
हेही वाचा… VIDEO: “निवडणूक संपली, प्रचार संपला”, रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
“आपल्याकडे राजकीय पक्षांचेपण खूप होर्डिंग लागतात. गावाकडे तर इतकी बिकट परिस्थिती आहे की, जेव्हा नेत्यांचा वाढदिवस असतो, तेव्हा जे दिशादर्शक बोर्ड असतात त्यावर लोक बॅनर लावतात. तुमचा नेता आहे, त्यांचा वाढदिवस असेल तर तुम्ही बॅनर लावा, पण दुसऱ्या दिवशीच ते काढून घ्या. यामुळे काय होतं, एकतर शहर स्वच्छ राहतं आणि ते बॅनर जर पुढच्या वाढदिवसापर्यंत राहिले तर त्या बॅनरसह नेता आडवा तिडवा होतो. मग तुम्हीच त्या नेत्याचा अपमान करताय असं होतं, म्हणून मला कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही होर्डिंग लावा, पण दुसऱ्या दिवशी ते लगेच काढा. आता काय होतंय, महानगरपालिकेची शक्ती त्याच्यामागे लागली आहे. महानगरपालिकेची एक गाडी येते, ती या सगळ्या होर्डिंग्स आणि बॅनर काढते. हा खरंतर अपव्यय आहे; तर आपल्या नेत्याबद्दल खरंच प्रेम असेल तर तुम्ही लावलेलं होर्डिंग तुम्ही स्वत:च काढा.