‘झी मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘पारू’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर १२ फेब्रुवारीला या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, पहिला भाग प्रसारित झाल्यावर प्रेक्षकांना एक खास सरप्राईज मिळालं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते भरत जाधव यांची झलक ‘पारू’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘पारू’ मालिकेचं संपूर्ण कथानक अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं बलाढ्य साम्राज्य आणि गावाकडून आलेली साधीभोळी ‘पारू’ यावर आधारित आहे. आता ही ‘पारू’ अहिल्यादेवींच्या मनात कशी जागा निर्माण करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा : “प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचा सामना कसा करावा?” चाहतीच्या प्रश्नावर सई लोकूर म्हणाली, “आई होणं…”
‘पारू’ मालिकेच्या पहिल्याच भागात अभिनेते भरत जाधव हे एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. अहिल्यादेवींचा लेक आदित्य किर्लोस्करची एका कामानिमित्त त्यांना (भरत जाधव) भेट घ्यायची असते. आदित्य भेटल्यावर “आपण ही डील पक्की करुया का?” असा प्रश्न ते विचारतात यावर आदित्य त्याला साफ नकार देतो. “ज्या गोष्टी माझ्या आईला मान्य नाहीत त्या मी करणार नाही” असं तो सांगतो.
आदित्य किर्लोस्करची डॅशिंग भूमिका अभिनेता प्रसाद जवादेने साकारली आहे. पहिल्याच भागात प्रसादला मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी प्रसादला मिळाली. ‘पारू’च्या निमित्ताने भरत जाधव यांच्या चाहत्यांना छोट्या पडद्यावर या दमदार अभिनेत्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली. २०२० मध्ये त्यांनी ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत काम केलं होतं.
आता ‘पारू’ मालिकेतील पुढच्या भागांमध्ये भरत जाधव दिसणार की नाहीत? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी भरत जाधव यांचा कॅमिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.