‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, ‘कॉमेडी सर्कस ३ का तड़का’, ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस के महाबली’, ‘कॉमेडी दंगल’ अशा विविध कार्यक्रमांतून प्रसिद्ध अभिनेत्री भारती सिंगने मोठी ओळख मिळवली आहे. तिच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. भारतीने आपल्या विनोदी अभिनयाने फार कमी काळात चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे. तिने आजवर साकारलेली अनेक विनोदी पात्रे तुफान गाजली आहेत. त्यातील लल्ली हे एका लहान मुलीचं पात्र प्रेक्षकांना फार आवडलं होतं. अशात भारतीने नुकताच बॉलीवूडच्या किंग खान म्हणजेच शाहरुख खानबरोबरचा ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मधील एक किस्सा सांगितला आहे.

भारती सिंग नुकतीच ‘द ठगेश शो’मध्ये आली होती. यावेळी तिने शाहरुख खानबरोबरचा ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मधील एक किस्सा सांगितला आहे. या शोमध्ये भारतीने शाहरुख खानला तिने साकारलेली ‘लल्ली’ ही भूमिका करण्यास सांगितले होती. तिच्या एका शब्दावर शाहरुख ही भूमिका करण्यासाठी तयार झाला होता. हा किस्सा सांगताना भारती म्हणाली, “त्यावेळी त्या इंडस्ट्रीमध्ये मी नवीन होते आणि गावावरून आले होते. तेव्हा माझ्या मनात शंका होती, शाहरुख खान सर खरोखर लल्ली हे पात्र साकारतील की नाही?”

मी रडू लागले…

“मला शाहरुख यांच्याबद्दल त्यावेळी फारशी कल्पना नव्हती. कारण- मी तोपर्यंत ‘मन्नत’सुद्धा पाहिलं नव्हतं. शोमध्ये मी शाहरुख सरांना म्हणाले की, सर तुम्ही ‘लल्ली’प्रमाणे तयार व्हाल का? ते लगेचच हो म्हणाले. त्यांना लल्ली या पात्रासाठी असलेला केसांचा विग घालण्यासाठी दिला. त्यावेळी ते म्हणाले ‘लल्ली’चा एक फ्रॉकसुद्धा आहे ना. त्यांनी तो मागवला आणि तो फ्रॉकसुद्धा घातला. त्यांनी माझ्या एका शब्दावर हे सर्व केलं होतं. त्यांना लल्लीच्या वेशात पाहून त्यावेळी माझे डोळे भरून आले होते. मी रडू लागले होते”, असं भारती सिंग म्हणाली.

तिने पुढे सांगितलं, “मी अमृतसरच्या एका गरीब कुटुंबातून मुंबईला आले होते. त्यावेळी शाहरुखसरांना मी एक गोष्ट करायला सांगितली आणि त्यांनी ती लगेच केली होती. माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर दिवसांपैकी हा एक दिवस आहे.”

शाहरुख खानच्या अभिनयासह त्याच्या स्वभावामुळेही त्याला ओळखलं जातं. बॉलीवूडमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवलेली असतानाही तो नेहमी मातीशी जोडलेला आहे. तसेच तो कायम सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतो. भारती सिंगबरोबरही त्याने तशीच वागणूक ठेवली.

Story img Loader