आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे भाऊ कदम. गेल्या कित्येक वर्षांपासून भाऊ कदम प्रेक्षकांना त्यांचं टेन्शन विसरायला लावून मनसोक्त हसवण्याचं काम करत आहेत. अशा या लोकप्रिय विनोदवीराची लेक सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. काही महिन्यापूर्वी भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तेव्हापासून ती अमेरिकेतील व्लॉग सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच मृण्मयी कदमने अमेरिकेत पहिल्यांदाच दिवाळी कशी साजरी केली? याचा व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये मृण्मयी आपल्या मैत्रिणींबरोबर अमेरिकेतल्या घरी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहे. तिने दिवाळी निमित्ताने पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने जेवण बनवलं आहे. तसंच मैत्रिणीबरोबर चिवडादेखील बनवला आहे. शिवाय लक्ष्मीपूजनच्या दिवशी तिने खास मराठमोळा लूक केला होता. तिने पैठणीचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
या व्हिडीओत मृण्मयी कदम म्हणतेय, “पहिली दिवाळी आहे; जी घरापासून लांब साजरी करत आहे. चला तर मग दाखवते तुम्हाला मी युएसएमध्ये कशी दिवाळी साजरी केली? मी पहिल्यांदा स्वतः डाळ, भात, बटाट्याची भाजी बनवली होती. दिवाळी असल्यासारखं वाटण्याकरिता आम्ही चिवडा घरी बनवला होता. त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी घराची साफसफाई केली. लक्ष्मीपूजनला मैत्रिणींनी कोबीची भाजी आणि पुऱ्या बनवल्या होत्या.”
हेही वाचा – Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
पुढे मृण्मयी सांगितलं की, लक्ष्मीपूजन दिवशी पैठणीचा ड्रेस परिधान केला होता. अमेरिकेत येण्याआधी तिने पैठणीचा ड्रेस शिवून घेतला होता. रूमची सुंदर सजावट वगैरे करून मृण्मयीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत आपल्या मैत्रिणींबरोबर दिवाळी साजरी केली.
दरम्यान, भाऊ कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते रंगमंच गाजवत आहे. भाऊ कदम यांचं ‘करून गेलो गाव’, ‘सीरियल किलर’ या नाटकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला भाऊ कदम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे भाऊ कदम स्टार प्रचारक झाले आहेत.