आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजेच भाऊ कदम. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमांतून भाऊ कदम यांनी चाहत्यांना खळखळून हसवलं. तर नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध ठिकाणी भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘फेरारी की सवारी’ या हिंदी चित्रपटातदेखील भाऊ कदम यांनी कम केलंय. परंतु, भाऊ हिंदीपेक्षा मराठी सिनेसृष्टीत जास्त रमतात, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम गेल्या महिन्यात बंद झाला. संपूर्णपणे १० वर्षं या कार्यक्रमानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यातील कलाकारांनी आपापले मार्ग शोधले. त्यातील हरहुन्नरी कलाकार कुशल बद्रिकेने हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात एन्ट्री मारली. कुशलसारखीच भाऊ कदम यांनाही हिंदी कॉमेडी शोसाठी ऑफर आली होती; परंतु भाऊंनी ती ऑफर नाकारली.
नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी याबाबत खुलासा केला आहे. भाऊ कदम म्हणाले, “मला हिंदी शोमधून ऑफर आली होती; पण मी ती नाकारली. मी म्हटलं नाही सर, मी आता थांबतो. आता मला नाही करायचंय. कारण- इकडेही विनोदी तिकडेही विनोदी.”
भाऊ पुढे म्हणाले, “माझं खरं कारण खरं तर वेगळंच होतं. तेव्हा ‘चला हवा येऊ द्या’च्या ब्रेकबद्दल चर्चा सुरू होती. मी म्हटलं एक-दोन आठवडे त्या गोष्टीमधून थोडी विश्रांती घेऊ. मला नवीन ठिकाणी रुळायला जरा वेळ लागतो. हिंदीत गेल्यावर आपल्याला मराठीत जेवढा मान मिळतो, तेवढा मिळेल का? हाही एक प्रश्न होता. ओळखीचे नाहीयेत तिकडे; तर त्या घरात रमायला थोडा वेळ लागेल, असं मला वाटलं. आता इथे मी साबळे असल्यामुळे बिनधास्त असतो. त्यामुळे भीतीचा मुद्दा नसतो आणि माझं तिकडे मन रमलं नसतं. ते करून काय मला माझ्या घरासारखा अनुभव नाही येणार, असं मला वाटतं. म्हणजे मी जेवढा मराठीमध्ये व्यक्त होऊ शकतो तेवढा त्या भाषेमध्ये नाही होऊ शकत. म्हणून मी म्हटलं नको, मी नाही करत.”
दरम्यान, निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम व सुपर्णा श्याम हे कलाकार नव्यानं प्रेक्षकांना हसविण्यासाठी हजर झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात या कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केलीय.