विनोदाचं अचूक टायमिंग साधत महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता म्हणून भूषण कडूला ओळखलं जातं. परंतु, गेल्या काही वर्षात हा गुणी अभिनेता कलाविश्वातून अचानक गायब झाला. त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. अनेकांनी भूषणने देश सोडलाय वगैरे अशा अफवा पसरवल्या. या सगळ्यावर मात करत आता अखेर भूषण कॅमेऱ्यासमोर आला आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने संपूर्ण सत्य परिस्थिती सांगितली आहे. सगळं छान सुरू असताना क्षणात चित्र कसं पालटलं याबद्दल त्याने सांगितलं आहे.
भूषण कडू सांगतो, “मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरांत जाऊन पोहोचलो. प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मला हळुहळू सिनेमे मिळाले. माझं लग्न झालं. कादंबरीसारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली. आम्हाला मुलगा झाला. सगळं ‘मस्त चाललंय आमचं’ असं म्हणत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसे चढउतार येतात अगदी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. मी त्यावेळी अनेक दु:ख पचवली. वडिलांचं जाणं, आईचं जाणं मग आजीचं जाणं आणि त्यानंतर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि माझी ‘कादंबरी’ वाचायची अर्धवट राहून गेली. कोव्हिडची शेवटची लाट होती, तेव्हा ती देवाघरी गेली आणि आयुष्यात खूप मोठा हादरा बसला.”
हेही वाचा : कार्तिकी गायकवाड झाली आई! गायिकेच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन; म्हणाली…
अभिनेता पुढे म्हणाला, “माझ्या पदरात ११ वर्षांचं लेकरू होतं. अचानक या गोष्टी घडल्यावर मी पूर्ण हललो. कादंबरी माझं सगळं मॅनेजमेंट सांभाळायची. एका बायकोचं नवऱ्याचं आयुष्यातून निघून जाणं…आणि त्याने मला एवढा मोठा हादरा बसू शकतो तर, एखाद्या बाईचा नवरा जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल? तिचं (पत्नी) महत्त्व मला पूर्णपणे कळून चुकलं होतं. या सगळ्या प्रसंगानंतर मी स्वत:ला जरा पडद्याच्या मागेच ठेवलं. मुलाची जबाबदारी पदरात होती पण, दु:ख काही केल्या कमी होत नव्हतं. अर्थात मुलाच्या जबाबदारीमुळे मला पुन्हा काम करणं गरजेचं होतं. मला प्रेक्षक जेव्हा विचारायचे सध्या तुम्ही काय करता? तेव्हा मी अगदीच निरुत्तर होतो. ‘बिग बॉस’मध्ये माझं कुटुंब अनेकांनी पाहिलं होतं…मी बरेच दिवस पडद्यावर नसल्याने काही जणांनी मी या जगात नाहीये असं जाहीर केलं होतं. माझ्याबद्दल खूप वावड्या उठल्या. कोव्हिडच्या काळात माझा आर्थिक संचय संपत होता आणि हळुहळू सगळे पैसे संपले. त्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे मला समजलं. एक वेळ अशी आली की माझ्याकडे पैसेच नव्हते. प्रचंड आर्थिक चणचण होती पण, कोणाला सांगणार? माझ्या मुलाने हा सगळा काळ पाहिला याची फार खंत आहे.”
“माझ्या सासूबाई, मेहुणा आहेत म्हणून मी मुलाला घरी ठेवून त्यांना कामासाठी बाहेर पडू शकतो. या काळात काही जणांनी खूप चांगली मदत केली. पण, काही लोकांनी पाठ फिरवली. कसेबसे मी दिवस ढकलत होतो. एके दिवशी ठरवलं की, हे सगळं पाहण्यापेक्षा आपण या जगातून निघून जाऊया…स्वत:ला संपवूया. मी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहायला घेतली पण ती संपेना…रोज मी ती चिठ्ठी लिहायचो आणि असाच एकदा मी बाहेर सामान आणायला गेलो. आमच्या इथे एक छत्र्यांचं दुकान आहे…मी विचार करत होतो छत्री घेऊ नको…दुकानदार बोलला ३५० रुपये किंमत आहे. माझं असं झालं अरे पैसे जपून वापरले पाहिजेत. तेव्हा माझ्या मनात विचार आला २२ व्यावसायिक नाटकं, ८-९ सिनेमे, ज्याने सात वर्षे कॉमेडी एक्स्प्रेस केली स्वत:च्या दोन-दोन गाड्या, ड्रायव्हर असं सगळं असलेला माणूस…आज त्या माणसाला ३५० रुपयांसाठी विचार करावा लागतो. तो प्रसंग माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हा माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला…ती माणसं म्हणाली, तुमचं काम आम्ही पाहतो. तुम्ही खूप चांगलं काम करता. मला तेव्हा फक्त कामाची गरज होती. आता हळुहळू प्रयत्न करून आणि स्वामीकृपेने मी कामासाठी सज्ज झालोय.” असं भूषण कडूने सांगितलं.