‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या शोमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेता भूषण कडू. आजवर त्याने अनेक चित्रपट, व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं आहे. परंतु, करोना काळादरम्यान भूषण अचानक कलाविश्वापासून दूर गेला. तो मनोरंजनसृष्टीत सक्रिय नसताना त्याच्याबद्दल अनेक अफवा उठवण्यात आल्या. करोनाची शेवटची लाट संपल्यावर भूषण कडूच्या पत्नीचं निधन झालं. यामुळे वैयक्तिक आयुष्यात तो पूर्णपणे कोलमडून गेला. या धक्क्यातून त्याला सावरता आलं नाही, याशिवाय पदरात ११ वर्षांचा मुलगा होता. हा सगळा प्रसंग भूषणने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्झिट का घेतली? व पुन्हा या शोमध्ये काम करण्याविषयी अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
भूषण कडू सांगतो, “हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींचा मी आवडता कलाकार होतो. मला तिकडून फोन आल्यावर मी खूप आनंदाने शो जॉइन केला होता. तिकडची सगळीच मंडळी खूप छान आहेत. पण, यामध्ये एक अडसर आला. मी जेव्हा आर्थिक संकटात होतो तेव्हा १-२ जणांकडून मी मदत घेतली होती. तेव्हा त्या व्यक्ती कशा आहेत हे मला समजलं नव्हतं. मला जसे चेक मिळायचे तेव्हा मी त्यांना पैसे द्यायचो. पण कालांतराने हे पैसे मागणारे लोक मला सेटवर येऊन त्रास देऊ लागले. त्यावेळी सरकारने खूप कडक गाइडलाइन्स दिल्या होत्या. आम्ही स्क्रिप्ट सुद्धा हाताळू शकत नव्हतो आणि सगळेजण नियमांचे पालन करायचे. मला तेव्हा खूप टेन्शन आलं होतं…सेटवर आमच्या माणसांव्यतिरिक्त दुसरं कोणी दिसलं तर ही व्यक्ती मला त्रास द्यायला आलीये का? अशी नकळत एक वेगळी भावना माझ्या मनात यायची.”
“हास्यजत्रेत काम करताना सगळे पैसे मला वेळेत, महिन्याच्या महिन्याला मिळायचे…मी लोकांची वेळेत उधारी दिली. पण, जेव्हा गोस्वामी सरांना करोनाची लागण झाली त्यावेळी एक महिना पैशांचे चेक काढणार कोण? असा प्रश्न होता. त्यामुळे तो एक महिना त्या समोरच्या लोकांना पैसे परत द्यायला माझ्याकडून विलंब झाला. एके दिवशी पैसे मागणारे लोक म्हणाले आम्ही आता सेटवर येणार, धमकीवजा फोन सुरू झाले. मला जेवण जात नव्हतं…सेटवर निघाल्यावर मला घाम फुटला, मी घाबरलो होतो. माझा एक मित्र आला त्याने मला डॉक्टरकडे नेलं. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं…त्यानंतर सलाईन लावलं आणि त्यादिवशी मी सेटवर गेलोच नाही. मला जेव्हा शुद्ध आली त्यावेळी रात्रीचे ८.३० वाजून गेले होते.” असं भूषणने सांगितलं
हेही वाचा : माधुरी दीक्षित : पाच फ्लॉप चित्रपट अन् एका ‘तेजाब’ने बदलली ‘धकधक गर्ल’ची कहाणी
अभिनेता पुढे म्हणाला, “शुद्ध आल्यावर सेटवर काय सांगायचं, घरी काय सांगायचं मला काहीच सुचत नव्हतं. या इंडस्ट्रीत पाठ वळली की, गॉसिप सुरू होतं. त्यानंतर काही लोकांकडून सरांच्या कानावर काही गोष्टी गेल्या. ड्रिंककरून पडला असेल, न सांगता दुसरं काम घेतलं असेल अशा अनेक वावड्या झाल्या आणि यामुळेच मनाविरुद्ध मला हास्यजत्रेतून एक्झिट घ्यावी लागली.”
हेही वाचा : बायकोचं निधन, आर्थिक चणचण ते आत्महत्येचा विचार; अखेर भूषण कडू झाला व्यक्त, सांगितला ‘तो’ कठीण काळ
“त्यानंतर मी सरांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. मनातून ठरवलं होतं सेटवर जाऊन पुन्हा एकदा त्यांना सांगायचं सर, मला घ्या शोमध्ये मला यायचंय…पण, ती हिंमत आजही नाही माझ्यात…एकदा सेटवर गेल्यावर सरांनी खूप आस्थेने चौकशी केली. पण, मला काम द्या हे सांगायची हिंमत तेव्हा सुद्धा मी केली नाही. मग, नव्याने काम शोधणं ओघाने आलंच…आता जशी कामं होतील तसे पुन्हा चांगले दिवस येतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि भविष्यात गोस्वामी सरांनी मला पुढच्या प्रोजेक्टमध्ये संधी देवो अशी इच्छा आहे.” असं भूषण कडूने सांगितलं.