मराठी अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. ‘बिग बॉस मराठी’मधून किरण मानेंना खरी ओळख मिळाली. दरम्यान मधल्या काळात किरण मानेंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. नुकतचं एका मुलाखतीत किरण मानेंनी त्या कठीण दिवसांवर भाष्य केलं आहे.
हेही वाचा- Video : सई ताम्हणकरला जोडीदाराकडून आहेत ‘या’ अपेक्षा, खुलासा करत म्हणाली “जी व्यक्ती…”
किरण माने म्हणाले, “मधल्या काळात मी खूपच वाईट परिस्थितीतून गेलो. त्यावेळी माझ्याविषयी गैरसमजही खूप झाले. बऱ्याच लोकांनी माझा द्वेषही केला आणि बऱ्याच लोकांनी माझ्यावर प्रेमही केलं. पण त्या काळानं मला खूप शिकवलं. जर तुम्ही खरे असला तर हार मानून चालणार नाही. माझ्यावर आरोप करणारे खरे असते तर मी लपून बसलो असतो. मला लोकांपुढे यायला लाज वाटली असती. मला माहिती होतं हे कधी ना कधी उघड होणार आहे.”
माने पुढे म्हणाले. “खरं कधीच लपत नाही. मी ठरवलं की लढायचं. येणारा काळ नक्कीच सत्य समोर आणतो. त्या काळात माझ्यावर इतके आरोप होत होते आणि त्या आरोपांचा विपर्ह्यास केला जात होता. त्यामुळे माझं आणि माझ्या घरच्यांच जगण मुश्किल होत होतं. मला फक्त हे आरोप खोडून काढून टिकून राहायचं होतं. त्यानंतर बिगबॉसने मला संधी दिली. बिगबॉसमध्ये आपल्याला खरा माणूस कळतो. पहिले आठ-दहा दिवस सगळे खोटं वागतात मग खरा माणूस कळतो”
हेही वाचा-‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ
किरण माने यांची नवी मालिका ‘सिंधुताई माझी माई’ ५ ऑगस्टपासून कलर्स मराठीवर प्रदर्शित होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत किरण माने यांनी सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.