‘बिग बॉस १६’ मध्ये प्राईज मनीवरून चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेशन टास्क ठेवण्यात आला होता. अंकित गुप्ता, श्रीजिता डे आणि विकास मानकतला या स्पर्धकांना घरातील सदस्यांनी एलिमिनेट केलं होतं. त्यामुळे ते डेंजर झोनमध्ये होते. अशातच प्रियांका चहर चौधरीने बक्षिसाच्या रकमेतून २५ लाखांचा त्याग करून अंकितला वाचवलं. पण अंकितला पुन्हा एलिमिनेशन प्रक्रियेचा सामना करावा लागला आणि यावेळी घरातील सदस्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

‘द खबरी’ नावाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात एक ट्वीट करण्यात आलंय. त्यानुसार, होस्ट सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना बजर दाबून शोमध्ये कमीत कमी योगदान करणाऱ्या स्पर्धकाला एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्याचा पर्याय घरातील सदस्यांना दिला. या प्रक्रियेदरम्यान, अंकितला घरातील सदस्याकडून सर्वाधिक मतं मिळाली आणि त्याला घराबाहेर काढण्यात आलं.

दरम्यान, अंकितला घराबाहेर काढल्याची बातमी आल्यानंतर अंकितचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांच्या मतांऐवजी घरातील सदस्यांना घराबाहेर काढण्याचा निर्णय देऊन अंकितला काढून टाकण्याची योजना आखल्याबद्दल त्यांनी निर्मात्यांना फटकारलं आहे. अंकित नसेल आपण ‘बिग बॉस १६’ पाहणार नाही, असंही अनेक युजर्सनी म्हटलंय.

‘बिग बॉस तुम्ही असा निर्णय घेऊन तुमच्या शोबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार करत आहात. तुमचा निर्णय चुकीचा आहे,’ ‘आतापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वात अयोग्य निर्णय आहे’, ‘खरं तर प्रियांकाने अंकितला वाचवून प्राईज मनीतील पैसे कमी केले, त्यामुळे अंकित नव्हे तर प्रियांका घराबाहेर जायला हवी होती’, अशा विविध प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. काही जणांनी शोचा होस्ट सलमानने स्पर्धकांच्या हातात हा निर्णय सोपवल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस १६’ मध्ये त्यांच्या वागणुकीबद्दल सलमानने ‘वीकेंड का वार’मध्ये एमसी स्टॅन आणि शालिन भानोत यांचा खरपूस समाचार घेतला. नॉमिनेशन टास्क दरम्यान, स्टॅन आणि शालिनमध्ये जोरदार वाद झाला होता आणि त्यांनी एकमेकांना धमक्या दिल्या होत्या.

Story img Loader