भांडण, वाद, प्रेम प्रकरण या गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास आढळतात. या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये हे चित्र पाहायला मिळते. सध्या कलर्स वाहिनीवर ‘बिग बॉस हिंदी’चे १६ वे पर्व सुरु आहे. या कार्यक्रमामध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे सहभागी झाला आहे. आपल्या स्वभावाने आणि खेळाने त्याने हिंदी चाहत्यांना खूश केले आहे. दिवसेंदिवस त्याची फॅन फॉलोइंग वाढत आहेत. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते.
अर्चना घरातील टिशू पेपर किचनमध्ये लपवून ठेवते. टिशू पेपरवरुन पुढे घरामध्ये वाद सुरु होतो. मग ती हळूच किचनमधून ते बाहेर आणते. तेव्हा निम्रित तिला ‘तू असं का केलंस’ म्हणत जाब विचारते. त्यावर अर्चना ‘मला त्यांची किचनमध्ये गरज होती’, असं उत्तर देते. हे ऐकून टिना दत्ता अर्चनावर ओरडायला लागते. त्याच्यामध्ये सुरु झालेला वाद थांबवण्याचा प्रयत्न शिव करतो. पण त्यामुळे अर्चना शिवशी भांडायला लागते. भांडताना तो अर्चनाला असं काहीतरी म्हणतो की, ती आणखी तावातावात भांडायला लागते. पुढे रागात शिवच्या जवळ येऊन ती त्याच्यावर हात उचलते आणि त्याचा गळा पकडते. प्रोमो व्हिडीओमध्ये हा प्रसंग स्पष्टपणे दिसतो.
तिच्या या कृत्यामुळे शिवला दुखापत होते. तेव्हा त्याच्यासह घरातील सर्व सदस्य मिळून अर्चना गौतमला घरातून बाहेर काढायची विनंती बिग बॉसकडे करतात. एकूण प्रकरणामुळे कार्यक्रमाचे लाईव्ह फिड काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते असे म्हटले जात आहे. आजच्या भागामध्ये बिग बॉस अर्चनाला घराबाहेर काढतात की नाही हे कळणार आहे.
हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्चनाच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘Bring back archana’ हा ट्रेंड सुरु केला आहे. तिला कार्यक्रमामधून बाहेर काढले असून काही कालावधीनंतर परत घरात घेतले जाणार आहे असेही म्हटले जात आहे.