‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. ‘बिग बॉस’मुळेच शिव नावारुपाला आला. गेली काही वर्ष हिंदी ‘बिग बॉस’मध्ये येण्याचं त्याचं स्वप्न होतं. तेही त्याने पूर्ण केलं. मात्र हिंदी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदापासून तो दूर राहिला. मात्र आज शिवने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता असला तरी शिवलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.
शिव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. अमरावतीमध्ये तो त्याच्या कुटुंबियांसह राहतो. आज त्याने कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान ‘बिग बॉस १६’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतरही तो आपली जन्मभूमी अमरावतीला विसरला नाही. त्याने अमरावतीबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अमरावतीबाबत काय म्हणाला शिव ठाकरे?
विरल बॉलिवूडला दिलेल्या मुलाखीतमध्ये शिवने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी अमरावतीचाही त्याने उल्लेख केला. तो म्हणाला, “चित्रपटामध्ये काम करणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी शिव ठाकरेलाही थोडा घाम गाळावा लागेल. ज्या गोष्टींसाठी मला विचारणा होईल ते मी करेन. कारण मला यामधून स्वतःला घडवायचं आहे.”
“यापुढे मला कदाचित मालिकेमध्ये काम करण्याचीही संधी मिळू शकते. चित्रपट मिळाला नाही तरी मालिकेपासून मी सुरुवात करेन. कारण बरेच लोक इथूनच पुढे गेले आहेत. मी अमरावतीमधून आलो आहे. मला बऱ्याचदा सांगावं लागलं की अमरावती नागपूरजवळ आहे. अमरावतीला लोक आणखी ओळखू लागले तर मीही खूश होईन. रिएलिटी शो व अभिनयामध्ये मी समतोल ठेवणार आहे. कारण रिएलिटी शोमध्ये एक वेगळीच मजा आहे.” शिवचं अमरावतीबाबत असणारं प्रेम खरंच कौतुकास्पद आहे.