दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसत आहे. शोमध्ये तो शिव ठाकरे, निम्रत, एमसी स्टॅन, अब्दू रोझिक आणि सुंबूल तौकीर खान यांच्याबरोबर मिळून गेम खेळत आहे. त्यांच्या टीमला मंडली नाव देण्यात आलं आहे. अशातच साजिदचा अॅटिट्यूड बदलल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये निम्रतने साजिदला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर तो चिडला.
नॉमिनेशन टास्कमध्ये निम्रतने त्याचं नाव घेताच साजिद खान एकदम चिडला. “आपल्याला नॉमिनेशनचा फरक पडत नाही. मी नॉमिनेशनला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. मी स्वतःला या शोच्या फिनालेमध्ये पाहतोय आणि फिनालेमध्ये मला माझ्याबरोबर या घरातील काही सदस्य दिसतात. तुम्ही मला १२ फेब्रुवारीपर्यंत नॉमिनेट करा आणि विजेतेपदाची ट्रॉफी कोण घरी नेतंय ते बघा” असं साजिद खान चॅलेंज देत म्हणाला. पण, साजिदचा हा अतिआत्मविश्वास नेटकऱ्यांना फारसा रुचला नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
‘आयुष्यात साजिद खान इतका कॉन्फिडन्स पाहिजे, बाकी काही नको’. ‘साजिद खानला माहितीये लोकांना एंटरटेन कसं करायचं, तेच तो करतोय, त्याचे काही चित्रपट तुम्ही पाहिले असतीलच’, ‘साजिद खान फेक आहे’. ‘खरं तर हे घरातील सदस्यांना नाही तर जनतेला चॅलेंज आहे. या आठवड्यात साजिदला नॉमिनेट करा आणि त्याला त्याची जागा दाखवा’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, या आठवड्यात साजिदसोबत सुंबुल तौकीर, अर्चना गौतम, शालिन भानोत, टीना दत्ता आणि श्रीजीता रे नॉमिनेटेड सदस्य आहेत. यांच्यापैकी कोण घराबाहेर पडणार हे आठवड्याच्या शेवटी कळेल.