Ankit Gupta Buys New Range Rover: हिंदी ‘बिग बॉस’चं १६वं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातील एक जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. ही जोडी म्हणजे अंकित गुप्ता आणि प्रियांका चाहर. दोघांना एकत्र बघायला प्रेक्षकांना खूप आवडायचं. पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळेच अंकित व प्रियांकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अंकित गुप्ताने नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेता अंकित गुप्ताने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या रेंज रोव्हरबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गाडीची पूजा करून तिचं चुंबन घेताना अंकित दिसत आहे. यावेळी अंकित पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स अशा लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अंकितने लिहिलं आहे, “तुझं घरी स्वागत आहे. मला इथंपर्यंत पोहोचवल्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच माझे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.”
अंकित गुप्ताच्या या खास क्षणी त्याचे मित्र, अभिनेता अभिषेक कुमार, करण वी ग्रोवरसह बरेच कलाकार उपस्थित होते. सर्वांनी अंकितच्या गाडीबरोबर फोटो शेअर केला आहे. याशिवाय अंकितच्या पोस्टवर टीना दत्ता, गौतम वीज, सचेत टंडन, राजीव अदातिया, अभिषेक कुमार, करण ग्रोवरसह बऱ्याच कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावर प्रियांका चाहरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अंकित गुप्ताच्या या आलिशान गाडीबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याच्या रेंज रोव्हरची किंमत जवळपास २.४ कोटी आहे. याआधी समर्थ जुरेलने रेंज रोव्हर खरेदी केली होती. अंकित शेवटचा ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत झळकला होता. ही मालिका फेब्रुवारीमध्ये ऑफ एअर झाली. या मालिकेत अंकित मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेबरोबर झळकला होता. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ऋतुजा बागवेसह बरेच मराठी कलाकार पाहायला मिळाले होते.