Pune Bypoll Election 2023: कसबा व पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या भागांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. अखेर कसबा व पिंपरी-चिंचवडला आज नवीन आमदार मिळणार आहेत. पण पुण्यातील या निवडणुकांचा फटका बिग बॉस फेम रॅपर एमसी स्टॅनसा बसला आहे. निवडणुकांमुळे एमसी स्टॅनचं पुण्यातील कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आलं आहे.
‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रॅपरने त्याच्या चाहत्यांसाठी संपूर्ण देशात दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याची सुरुवात एमसी स्टॅनने लहानाचा मोठा झालेल्या पुणे शहरापासून करण्याचं ठरवलं होतं. यानुसार ३ मार्चला त्याचं पुण्यात कॉन्सर्ट होणार होतं. बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनचं हे पहिलंच कॉन्सर्ट होतं. परंतु, पुण्यातील निवडणुकांमुळे स्टॅनला त्याच्या कॉन्सर्टची तारीख बदलावी लागली आहे. रॅपरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…
पुण्यातील एमसी स्टॅनचं कॉन्सर्ट कसबा व पिंपरी-चिंचवड निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलं आहे. आता ३ मार्चऐवजी १९ मार्चला स्टॅनचं कॉन्सर्ट होणार आहे. “एमसी स्टॅन बस्ती का हस्ती…एमसी स्टॅनचं पुण्यातील कॉन्सर्ट ३ मार्चऐवजी १९ मार्चला आयोजित करण्यात आलं आहे. निवडणुकांमुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन हा बदल करण्यात आला आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. ३ मार्चच्या कॉन्सर्टसाठी तुम्ही खरेदी केलेल्या तिकिटांवरच १९ मार्चच्या कॉन्सर्टला हजेरी लावता येईल”, असं एमसी स्टॅनच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल झाला आहे. रॅपरला अनेक ब्रॅण्डकडून ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडून त्याला गाण्याची ऑफर मिळाली आहे. बिग बॉस नंतर स्टॅनच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली आहे.