‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मराठमोळा शिव ठाकरे व पुण्याचा एमसी स्टॅन या दोघांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. एमसी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. तर शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच शिवने एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीबरोबरच घरातील सदस्यांबाबतही भाष्य केलं. शिव म्हणाला, “एमसी स्टॅनला ट्रॉफी मिळाल्याचा मला आनंद आहे. तो माझा मित्र आहे. आम्ही दोघं मित्र शेवटपर्यंत पोहोचलो यामुळे मी खूश आहे. बिग बॉसच्या घरातील प्रवास पूर्ण केल्याचा मला आनंद आहे.रोडिजमध्ये पण मी शेवटपर्यंत होतो”.
हेही वाचा>> करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्याचा खुलासा म्हणाला “मार्च महिन्यात…”
शिवने ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांबाबतही मुलाखतीत खुलासा केला. “मराठीमधून हिंदी बिग बॉसमध्ये आल्याने मला सुरुवातीला टार्गेट केलं गेलं. मराठी भाषिक प्रादेशिक कलाकार आला आहे तर दोन दिवसात बाहेर पडेल, असं त्यांना वाटलं होतं. पण मी त्यांची वाट लावून मी फायनलपर्यंत पोहोचलो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे”, असं शिव म्हणाला.
हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच शिव ठाकरेचं एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबाबत वक्तव्य, म्हणाला “प्रेम हे…”
शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस हिंदी’ची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण एमसी स्टॅनने बाजी मारुन विजेतेपद पटकावलं.