‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मराठमोळा शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या यंदाच्या पर्वाचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. परंतु, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
शिवने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवने ‘बिग बॉस’बरोबरच इतर अनेक गोष्टींबाबतही भाष्य केलं. ‘बिग बॉस’मुळे शिवच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अमरावतीतही शिवचं जंगी स्वागत करण्यात आलं. याबाबत शिव म्हणाला, “आता कुठे माझ्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला आहे. मी जिथे जाईन तिथे माझ्या मागे कॅमेरा घेऊन मीडिया येते. सगळे मला म्हणतात, गर्दीमध्ये उतरू नको. फक्त गाडीमधून चाहत्यांना हात दाखव. पण मला हे पटत नाही. मी चाहत्यांच्या गर्दीत उतरतो. कारण, यासाठीच मी ही सगळी मेहनत घेतली आहे”.
हेही वाचा>> Video: तुरुंगात असलेल्या पतीकडून राखी सावंतला धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “डॉनला…”
हेही वाचा>> निमृत कौरबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन, म्हणाला “माझ्या हृदयात…”
“मी सेलिब्रिटींप्रमाणे वागत नाही, असं मला अनेक जण म्हणतात. पण, मी सेलिब्रिटी झालोय असं मला अजूनही वाटत नाही. जोपर्यंत वांद्रेमध्ये माझा बंगला किंवा वाडा नसेल तोपर्यंत सेलिब्रिटी झाल्याचं फिलिंग मला येणार नाही” असंही शिव पुढे म्हणाला. लवकरच मोठ्या पडद्याचं स्वप्नही पूर्ण करणार असल्याचं शिव म्हणाला.
शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’ची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे शिवची हिंदी बिग बॉसची ट्रॉफी हुकली.