येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा आहे. यासाठी आता काही तास उरले आहेत. यंदाच्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे लवकरच समजणार आहे. पण त्याआधी प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने शिव ठाकरेला मोठी ऑफर दिली आहे.
बिग बॉस १६ च्या संपूर्ण सीझनमध्ये शिव ठाकरे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अर्थात शिव ठाकरे या सीझनचा विजेता होणार की नाही हे तर काही तासांनंतर समजणार आहेच. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याआधीच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने मात्र शिव ठाकरेला मोठी ऑफर दिली आहे. महाअंतिम सोहळ्याआधी रोहित शेट्टी बिग बॉस हाऊसमध्ये सर्व स्पर्धकांबरोबर जबरदस्त टास्क करताना दिसणार आहे.
आणखी वाचा- शिव ठाकरे नाही तर ‘हा’ स्पर्धक ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता? हातात ट्रॉफी घेतलेला फोटो व्हायरल
रोहित शेट्टी या शोमध्ये टास्क फक्त शोचा एक भाग म्हणूनच करत नाहीये तर त्याचा हेतू खतरों के खिलाडी १३ साठी स्पर्धकांची निवड करणे हा आहे. बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून रोहित शेट्टी बिग बॉस स्पर्धक शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी चहर, शालीन भानोत यांना टास्क देताना दिसत आहे. त्यानंतर तो सांगतो की तुमच्यापैकी एकाला खतरों के खिलाडीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.
रिपोर्ट्सनुसार रोहित शेट्टीने बिग बॉस फायनलिस्टना एकापेक्षा एक कठीण टास्क देताना दिसत आहे. त्यानंतर तो शिव ठाकरेला ‘खतरों के खिलाडी’साठी निवडतो. शिव ठाकरे व्यतिरिक्त खतरों के खिलाडीसाठी अर्चना गौतमचंही नाव समोर येत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यांच्या दिवशी रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी १३’च्या पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर करणार आहे.