‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व सध्या ग्रँड फिनालेच्या दिशेने जात आहे. हा या शोचा शेवटचा आठवडा आहे. विकेंडला सुंबूल तौकिर खान एविक्ट झाल्यानंतर घरात सध्या शिव ठाकरे, निमृत कौर अहलूवालिया, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, शालीन भानोत हे सहा सदस्य आहेत. शोच्या फिनालेपूर्वी आणखी एक नॉमिनेशन होणार आहे. पण, यावेळी वोटिंगच्या आधारे नाही तर घरात आलेले प्रेक्षक फिनालेमधील टॉप ५ सदस्य निवडणार आहेत.
“विवाहित महिलेला डेट करण्यात…” जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा धक्कादायक खुलासा
‘बिग बॉस’च्या घरात फिनालेपूर्वी पुन्हा एकदा जनता घरात येईल आणि आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करेल आणि त्याला सुरक्षित करेल. शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये प्रत्येक स्पर्धक स्टेजवर येताना आणि समोर बसलेल्या लोकांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अर्चना सुरुवातीपासून एकटीच खेळत असल्याचे सांगते. तर, आपल्याला फक्त प्रेक्षकांच्या प्रेमाची गरज आहे, कारण तुमच्यामुळेच मी इथे आहे, असं शिव सांगतो. प्रियंका म्हणते की, घरात येण्यापूर्वी मी विचार केला होता की मी जे करेन ते मनापासून करेन.
सर्वांचं बोलून झाल्यावर सर्व स्पर्धक प्रेक्षकांना खूश करण्यासाठी डान्स देखील करतात. यावेळी शालीन भानोत आणि अर्चना गौतम यांनीही डान्स केला. पण उत्साहात दोघांचाही बॅलेन्स बिघडतो आणि ते धापकन खाली पडतात. दोघांनाही खाली पडताना पाहून स्पर्धक व घरातील सदस्य हसू लागतात. हा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, एक महिना एक्स्टेंड झाल्यानंतर अखेर ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा फिनाले प्रेक्षकांना रविवारी १२ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. शो कोण जिंकणार याची उत्सुकता तर प्रेक्षकांना लागली आहेच, पण त्यापूर्वी शोचे टॉप ५ सदस्य कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना गौतम किंवा शालीन भानोत या दोघांपैकी एक स्पर्धक फिनालेपूर्वी घराबाहेर पडेल, असं दिसतंय.