‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्याचपूर्वी या घरातील टॉप ५ सदस्यांची चर्चा सुरू आहे. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी या पाच सदस्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. दरम्यान मराठमोळ्या शिवची सोशल मीडियावर अधिकाधिक चर्चा रंगताना दिसत आहे.
शिवला त्याच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ यांसारख्या मंडळींनी शिवसाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत शिवला वोट करा असं म्हटलं होतं. आता त्याच्या आई-वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे.
शिवच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या टीमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे आई-वडील शिवला भरभरुन वोट करा असं सांगताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमध्ये शिवच्या आई-वडिलांचा साधेपणा नेटकऱ्यांना व त्याच्या चाहत्यांना भावला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
शिवच्या आईने साडी तर वडिलांनी साधी पँट व शर्ट परिधान केला असल्याचं दिसत आहे. आई शिवच जिंकणार, तुम्हा दोघांनाही बघितल्यानंतर शिवमध्ये असणारे संस्कार कुठून आले हे समजलं, तुम्ही खूपच साधे आहात, तुमच्यामधील साधेपणा भावला, आमचा शिव दादाच जिंकणार अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत.