‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड गाजत आहे. शिवाय वादादरम्यान तो स्वतःवर करत असलेलं नियंत्रणही कौतुकास्पद असल्याचं बोललं जातं. दरम्यान शिवच्या खेळावर त्याच्या कुटुंबातील मंडळीही अगदी खूश आहेत. त्याचा खेळ त्याच्या आईला खूप आवडत आहे.
आणखी वाचा – “तो आतापर्यंत…” वीणा जगतापबरोबर असलेल्या नात्याबाबत शिव ठाकरेची आई स्पष्टच बोलली
‘बिग बॉस मराठी’चं विजेतेपद पटकावल्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’मध्ये शिवने प्रवेश केला. तिथेही त्याने स्वतःला सिद्ध केलं. शिवच ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकणार असं त्याचे चाहते सातत्याने म्हणत आहेत. तर शिवच्या आईलाही तोच विश्वास आहे.
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवची आई म्हणाली की, “माझा मुलगा म्हणून नव्हे तर विजेतेपद मिळवण्याचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. तसेच प्रेक्षकही माझ्या या मताशी सहमत असतील.” शिवलाच ट्रॉफी मिळावी असं त्याच्या आईचं मत आहे.
पुढे शिवची आई म्हणाली, “मला आशा आहे की सगळ्या गोष्टी योग्य त्या पद्धतीने होतील. पात्र उमेदवाराला म्हणजेच शिवला ही ट्रॉफी मिळेल.” शिव ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये ज्याप्रकारे खेळत आहे त्याचा त्याच्या आईला अभिमान आहे. आता ‘बिग बॉस १६’चा विजेता कोण ठरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.