‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी(१२ फेब्रुवारी) ‘बिग बॉस हिंदी’चा अंतिम सोहळा पार पडला. सर्वाधिक मतं मिळवत पुण्याच्या रॅपर एमसी स्टॅनने बिग बॉस हिंदी १६च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी टॉप २ मध्ये स्थान मिळवलेल्या शिव ठाकरे व एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक असलेला शिव यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. शिव बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाच्या ट्रॉफीवरही तो नाव कोरेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्याने शिवची ‘बिग बॉस’ची ट्रॉफी थोडक्यासाठी हुकली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिव ठाकरेने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवने एमसी स्टॅनच्या विजेतेपदाबाबत भाष्य केलं.
हेही वाचा>> सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं पत्नीसह अंडर वॉटर लिपलॉक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
शिव म्हणाला, “बिग बॉसची ट्रॉफी दुसऱ्या कोणाला मिळाली असती, तर मला जास्त दु:ख झालं असतं. पण एमसी स्टॅन विजेता झाल्यामुळे मी खूश आहे. मला याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रॉफी न मिळाल्याचं थोडं दु:ख आहे. शेवटी वाईट तर वाटणारच. पण मी बिग बॉसमधील प्रवास पूर्ण केला, याचा मला आनंद आहे. मी माझे १०० टक्के दिले आहेत. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक क्षण मी जगलो आहे”.
हेही वाचा>> पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजताच शालिन भानोत आश्चर्यचकित, म्हणाला “दलजित कौर आणि…”
एमसी स्टॅनला ट्रॉफी मिळण्यावरही शिवने वक्तव्य केलं आहे. “बिग बॉसची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या नशिबात होती.तो त्याचा हक्क आहे. म्हणून तो जिंकला. माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं. मी आणि स्टॅनने स्टेजवर एकत्र उभं राहण्याचं स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण झालं. याचा मला आनंद आहे”, असं शिव पुढे म्हणाला.