‘बिग बॉस’ हिंदीचं सध्या १६वं पर्व सुरू आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वी दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री झाली आणि घरातील वातावरण बदललं. विकास मनकतला आणि श्रीजिता डे घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आले. श्रीजिताने वाईल्ड कार्डच्या रुपात पुनरागम केलं. ती शोच्या पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनमध्ये घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर निर्मात्यांनी तिला वाईल्ड कार्ड म्हणून परत घरात आणलंय. श्रीजिता घराबाहेर राहून स्पर्धकांचा खेळ पाहून आली आहे. त्यामुळे ती त्यानुसार तिचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर श्रीजिता परतल्यापासून तिने सर्वाधिक वाद टीना दत्ताशी घातले आहेत.
टीना दत्ता आणि श्रीजिता या जुन्या मैत्रिणी आहेत. त्यांनी एकाच मालिकेत एकत्र कामही केलं होतं, पण ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर त्यांचं मैत्रीचं नातं दिसून आलं नाही. दोघींमध्ये वाद आणि कुरबुरी पाहायला मिळत आहेत. श्रीजिता आणि टीना दोघींचे कुटुंबीयही एकमेकांना चांगलं ओळखतात. त्यांच्या आईही चांगल्या मैत्रिणी आहेत, पण या दोघींच्या नात्यात बिग बॉसच्या घरात आल्यानंतर दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी दोघींमध्ये वाद झाल्यानंतर टीनाने विकासशी बोलताना श्रीजिताच्या घराचा पत्ता सांगितला होता. तसेच श्रीजिता असं का वागतेय हे कळत नसल्याचं टीनाने म्हटलं होतं. त्यानंतर श्रीजिताचा पत्ता नॅशनल टीव्हीवर दाखवल्याने तिचा होणारा पती मायकल बीपी याने ट्विटरवरून शोच्या निर्मात्यांवर टीका केली होती. दरम्यान, आता श्रीजिता टीनाबद्दल घरातील सदस्यांशी बोलता दिसत आहे.
कलर्स टीव्हीने प्रसारित केलेल्या नव्या प्रोमोमध्ये श्रीजिता टीनाबद्दल बोलताना दिसत आहे. त्यात तिने अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय, असंही श्रीजिता म्हणते. प्रोमोची सुरुवात ‘सत्य हे थोडं विचित्र असतं’, या वाक्यासह होते. त्यानंतर श्रीजिता सौंदर्याशी बोलू लागते. “टीना मुलांच्या अटेंशनशिवाय राहूच शकत नाही. तिने आतापर्यंत अनेकांचे घर तोडण्याचा आणि संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः मात्र अजूनही लग्न केलं नाहीये. तुम्ही स्वतः इतके नाखुश आहात, की तुम्हाला दुसऱ्यांना खाली खेचून आनंद मिळतो,” असं श्रीजिता टीनाबद्दल सौंदर्याशी बोलताना म्हणते.
दरम्यान, श्रीजिताच्या या बोलण्यावरून घरात गोंधळ होतो का किंवा याबद्दल टीनाला कळाल्यानंतर काय होणार, हे शोच्या आगामी एपिसोडमधून कळेल.