बिग बॉस १६ सुरू होऊन आता जवळपास १ आठवडा उलटून गेला आहे. पण या आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. प्रेक्षकांच्या त्यांच्या आवडत्या कलाकारांचं वेगळंच रुप बिग बॉसच्या घरात पाहायला मिळालं आहे. पण या सगळ्यात घरातील इतर सदस्यांच्या निशाण्यावर दोन सदस्य कायम आहेत ते म्हणजे, सुंबुल तौकीर खान आणि अभिनेता शालीन भानोत. दोघंही नेहमीच एकमेकांसह जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. या दोघांमधील जवळीक पाहता घरातील इतर सदस्यांनीही त्याच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली आहे मात्र दोघंही एकमेकांचे मित्र असल्याचं सांगत आहेत. आता या दोघांच्या नात्यावर अभिनेत्री सुंबुलच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘टाइम्स नाऊ’ बोलताना सुंबुल तौकीरच्या वडिलांनी शालीन भानोतशी त्यांच्या मुलीच्या बॉन्डिंगबाबत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ते शालीनला ओळखतहा नव्हते असं सांगितलं. पण आता आपण त्याला ओळखू लागलो आहे असंही ते म्हणाले. आपल्या मुलीच्या शालीनसह असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा सुंबुलने त्यांना बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळीच तिने ती शादी डॉटकॉमची परफेक्ट मॅच शोधण्यासाठी नाही तर बिग बॉस खेळण्यासाठी जात असल्याचं स्पष्ट केलं होतं.
आणखी वाचा- Video : “अरे हे तर सार्वजनिक होतंय…” पत्नी जया बच्चन यांची तक्रार ऐकून बिग बी झाले अवाक
सुंबुलचे वडील म्हणाले, “ती जे काही करत आहे आणि तिचं जे काही प्लानिंग आहे ते सर्व करण्याचं तिला स्वातंत्र्य आहे. जर एवढ्या छोट्याशा गोष्टींवरून जर आम्ही तिला परत बोलवू तर मग मी तिला जे काही बोललो आहे आणि जी कविता लिहिली आहे ते सर्व व्यर्थ आहे. जर ती काही खेळ खेळत आहे आणि चुका करत असेल तर अखेरीस ती त्यातून शिकणार आहे. कारण तिला मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत असणार नाही. त्यामुळे मला या सगळ्याचं अजिबात टेन्शन नाहीये. पण जेव्हा लोक तिची चिंता करताना दिसतात तेव्हा मला खूप चांगलं वाटतं.”