‘बिग बॉस १६’मधील स्पर्धक सुंबूल तौकीर खान वयाच्या १८व्या वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘बिग बॉस’च्या घरात सुंबूल आल्यानंतर शालीना भानोत व टीना दत्ताबरोबर तिची मैत्री जमली. पण या त्रिकुटामध्ये वाद निर्माण झाले आणि दोघांपासूनही सुंबूल दूर झाली. शालीनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं. दरम्यान सुंबूलचे वडील तिला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’मध्येही आले. इतकंच नव्हे तर त्यांनी पुन्हा फोनद्वारेही लेकीशी संवाद साधला. पण सुंबूलच्या वडिलांनी हे सारं कशासाठी केलं याबाबत आता चर्चा रंगत आहे.
‘बिग बॉस १६’च्या गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये सुंबूलच्या वडिलांसह टीना व शालीनच्या पालकांनीही हजेरी लावली होती. यावेळी सुंबूलच्या वडिलांचं खरं सत्य समोर आलं. टीना व शालीनच्या पालकांसह सलमान खाननेही तुम्ही आजारी असल्याचं कारण सांगत सुंबूलशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला. शिवाय तुम्ही आयसुयीमध्ये होतात असं वाटत नाही असंही शालीनचे वडील यावेळी त्यांना म्हणाले.
सुंबूलला भेटल्यानंतर पुन्हा आजारपणाचं कारण सांगून ‘बिग बॉस’ने त्यांना लेकीशी फोनद्वारे बोलण्याची संधी दिली. पण याचा त्यांनी गैरफायदा घेतला. टीना व शालीनची लायकी काढत मुलीला शिव्या शिकवत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. शिवाय सुंबूलच व तिच्या वडिलांचं खासगी आयुष्यही सगळ्यांसमोर आलं.
सुंबूल ६ वर्षांची असतानाचा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. वडिलच तिचा सांभाळ करतात. ‘बिग बॉस १६’ सुरु झाल्यापासून फक्त भावनिक गोष्टी सांगून प्रेक्षकांचं लक्ष आपल्या लेकीकडे आणि स्वतःकडे वेधून घेण्याचा सुंबूलचे वडील प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. ‘बिग बॉस’नेही लेकीशी आजारपण व तब्येतीबाबत न बोलता बाहेरच्या गोष्टींचंच अधिक ज्ञान दिलं असं सुंबूलच्या वडिलांना म्हटलं होतं. सुंबूलचे वडील स्वतःच्या लेकीसाठी नव्हे तर लाइमलाइटसाठी हे सगळं करत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.