टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणाऱ्या ‘बिग बॉस’चे १६ वे पर्व सुरू झाले आहे. आठवड्याभरानंतर आता घरातील सदस्यांना टास्क दिले जात आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात एंट्री केलेले सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करताना दिसत आहेत. पण या सगळ्यात सुंबुल तौकीर आणि शालीन भानोत यांच्या नावाची सगळीकडे चर्चा आहे. या दोघांमधील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
‘बिग बॉस १६’मध्ये ‘इमली’ फेम अभिनेत्री सुंबुल तौकीर शालीन भानोतचा मागे मागे फिरताना दिसते. त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते असं अनेकांचं म्हणणं आहे. ती शालीनकडे कधी तक्रार करताना दिसते. तर कधी मन मोकळं करून रडताना दिसते. पण या सगळ्यात अनेकांना त्यांच्या मैत्रीपेक्षा जास्त काही आहे असं वाटतंय घरातील काही सदस्यांनी तर यावरून तिला टोमणेही मारले आहेत. सुंबुलने जेव्हा बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली होती त्यावेळी तिने शो आणि प्रेम याबाबत व्यक्तव्य केलं होतं. मी इथे कनेक्शन तयार करण्यासाठी नाही कर गेम खेळून बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी आले आहे असं ती म्हणाली होती.
याशिवाय एका मुलाखतीत सुंबुलला विचारलं गेलं होतं की, ‘तू या शोसाठी अजून खूप लहान आहे, तुझ्या वडिलांनी तुला रिलेशनशिपबाबत काही ताकीद दिली आहे का?’ याचं उत्तर देताना सुंबुल म्हणाली, “नाही, माझ्या वडिलांनी मला कोणतीही ताकीद दिलेली नाही आणि हा शो म्हणजे जीवन साथी डॉट कॉम नाही की मी तिथे जाऊन जोडीदार शोधेन. माझे लक्ष फक्त आणि फक्त शो जिंकण्यावर असेल.”
सुंबुल पुढे म्हणाली, “मला माहीत आहे की माझं वय पाहून लोक मला प्रश्न विचारतील, मी आता फक्त १८ वर्षांची आहे पण जेव्हा ते माझ्यासोबत वेळ घालवतात. तेव्हा त्यांना मी किती समजदार आहे हे लक्षात येतं. मला स्वत:वर विश्वास आहे की मी माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि अनुभव असलेल्या लोकांपेक्षा चांगले काम करेन.”