‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला विजेता अल्ताफ तडवी उर्फ एमसी स्टॅन (Mc Stan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खळबळजनक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सतत एमसी स्टॅन अशा खळबळजनक स्टोरी का करतो? असा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काल, पुन्हा एकदा एमसी स्टॅनने चाहत्यांना हैराण करणारी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
बऱ्याच दिवसांपूर्वी ९ मे ला एमसी स्टॅनने ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. याबाबत देखील त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. “ब्रेकअप…जेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि गृहीत धरलं जातं तेव्हा सर्वात दृढ झालेलं नातं देखील संपुष्टात येतं,” असं एका स्टोरीमध्ये लिहिलं होतं. तसंच दुसऱ्या स्टोरीमध्ये “समाप्त” असं लिहिलं होतं. या स्टोरीमुळे एमसी स्टॅनच्या चाहत्यांना धक्काच बसला. कारण एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’मध्ये नेहमी गर्लफ्रेंड बुबाचा (अनम शेख) उल्लेख करायचा. बुबावर किती प्रेम करतो, तिच्याशी लग्न करायचं आहे, असं इतर सदस्यांना नेहमी सांगायचा. पण अचानक त्याचा ब्रेकअप झाला. यानंतर एमसी स्टॅनने देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना केली. त्याच्या या इन्स्टाग्राम स्टोरीने पुन्हा खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वीच एमस्टी स्टॅनने मृत्यूबाबत स्टोरी शेअर केली होती; ज्यात लिहिलं होतं, “या अल्लाह, बस मौत दे.” त्याची ही स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि सर्व चाहते चिंता व्यक्त करू लागले. “हे काय होतं आहे?”, “असं करू नकोस आपल्या चाहत्यांच्या विचार कर”, “आयुष्यात चढ-उतार येत असतात, मृत्यू हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही”, अशा एमसी स्टॅनच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
एवढं सगळं होऊनही काल पुन्हा एमसी स्टॅनने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर त्याने लिहिलं आहे, “थकलो.” त्याच्या या स्टोरीने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं असून एमसी स्टॅनला झालंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, एमसी स्टॅनबद्दल बोलायचं झालं तर, त्याला लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनने वयाच्या बाराव्या वर्षापासून करिअरला सुरुवात केली होती. या वयात तो कव्वाली गायचा. अनेक मोठ्या गायकांबरोबर त्याने परफॉर्म केलं आहे. सहावीला असताना एमसी स्टॅनने रॅप लिहायला सुरुवात केली आणि आठवीला असताना त्याने पहिलं रॅप गाणं गायलं. मग ‘तडीपार’, ‘इंसान’ हे त्याचे दोन अल्बम एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरले. या गाण्यांमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेला एमसी स्टॅन आज त्याच्या मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झाला आहे.