‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं. त्याचं विजेता म्हणून जेव्हा नाव घोषित करण्यात आलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याला सर्वाधिक वोट मिळाल्यामुळे एमसी विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. पहिल्या दिवसापासूनच एमसी स्टॅन या घरातील चर्चेचा विषय ठरला होता. त्याची घरातील काही सदस्यांशी असलेली मैत्री चर्चेत राहिली. तर काही सदस्यांशी त्याचं अजिबात पटलं नाही.
‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर अर्चना गौतमचं तोंडही न बघण्याची इच्छा एमसी स्टॅनने बोलून दाखवली होती. त्यांचं या घरामध्येही कधीच पटलं नाही. आता याबाबतच अर्चनाने भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्चनाने एमसीने केलेल्या वक्तव्याबाबत सडेतोड उत्तर दिलं.
काय म्हणाली अर्चना गौतम?
अर्चना म्हणाली, “मला याबाबत काहीच वाईट वाटलं नाही. ते त्याचे स्वतःचे विचार आहेत. आणि माझे विचार वेगळे आहेत. माझं तर असं काहीच नाही. याउलट मी त्याला भेटणार. त्याची गर्लफ्रेंड बुबालाही मला भेटायचं आहे. एकदा मला बुबाला बघायचं आहे असं मी त्याला बोलली आहे.” अर्चनाला एमसीच्या वक्तव्याचं काहीच वाईट वाटलं नाही.
तर एमसीने मंडलीमधील सदस्यांना भेटणार असल्याचं सांगितलं. शिव ठाकरे, साजिद खान, अब्दू रोझिक, निमृत कौर, सुम्बूल तौकीर यांच्याशी तो मैत्री कायम ठेवणार आहे. एमसी सध्या त्याला मिळत असलेलं चाहत्यांचं प्रेम एण्जॉय करताना दिसत आहे. तर लवकरच तो भारत दौराही करणार आहे.