‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नावावर केली. मराठमोळा शिव ठाकरे व एमसी स्टॅन यंदाच्या पर्वाचे टॉप २ स्पर्धक होते. ट्रॉफीसाठी दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.
एमसी स्टॅन व शिव ठाकरेमध्ये बगि बॉसच्या घरात घट्ट मैत्री झाली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार होता. त्यामुळेच एमसी स्टॅनला विजेता घोषित केल्यानंतर शिवच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एमसी स्टॅन ‘बिग बॉस हिंदी’चा विजेता ठरल्यानंतर शिवने त्याला उचलून घेत तो क्षण साजरा केला होता. त्या क्षणाचा फोटो शेअर करत एमसी स्टॅनने पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा>> “प्यार का रंग…” लग्नानंतर कियारा अडवाणीची पती सिद्धार्थ मल्होत्रासाठी खास पोस्ट
“ऐतिहासिक क्षण. सर्व चाहत्याचे आभार. बिग बॉसमधील प्रवास किती छान होता, हे तुम्हालाही माहीत आहे. संपूर्ण भारतातून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. हक है सबको”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. स्टॅनने सलमान खानचेही आभार मानले आहेत. “मार्गदर्शन केल्याबद्दल आणि नेहमी योग्य दिशा दाखविल्याबद्दल धन्यवाद सलमान भाई”, असं स्टॅनने म्हटलं आहे.
एमसी स्टॅनने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.