‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात सध्या अंकित लोखंडे व विकी जैन या सेलिब्रिटी जोडीमध्ये टोकाचे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता-विकीची जोडी शोमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्या काही महिन्यात दोघांच्या नात्यात अनेकदा दुरावा आल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं आहे. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धक मनारा चोप्रा व मुनव्वर फारुकीमुळे या जोडप्यात टोकाचे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस १७’च्या घरातील नवीन प्रोमो निर्मात्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये विकी जैन मनारा चोप्राकडे येऊन “तू जेवली नाहीस का?” असं विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपला नवरा दुसऱ्याच स्पर्धकाची एवढी काळजी घेत असल्याचं पाहून अंकिता लोखंडे अस्वस्थ होऊन तिथून निघून जाते.
अंकिताची समजूत काढण्यासाठी विकी पळत तिच्या मागे जातो. त्यावर अंकिता नवऱ्याला “मनाराची एवढी प्रेमाने चौकशी का करतोय?” याबद्दल विकीला जाब विचारते. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. “तुझी नेमकी अडचण काय आहे? मी मला हवं तिथे बसून जेवेन” असं उलटं उत्तर विकी अंकिताला देतो.
अंकिता शेवटी तुला हवं ते कर असं बोलून नवऱ्यासमोरून निघून जाते. परंतु, त्यानंतर विकी, “तू मुनव्वरचा हात पकडते, त्याला मिठी मारते…तुला सूट देतो ना मी? हे बंद कर…इथून पुढे तू मुनव्वरशी बोलायचं नाही आणि मी मनाराशी बोलणार नाही विषय बंद असं सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.” नवऱ्याचं हे सांगणं अंकिताला अजिबात पटत नाही.
दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील हा प्रोमो सर्वत्र व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडे व विकी जैन या जोडप्याला नव्या प्रोमोमधील वाद पाहून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.