Bigg Boss Update 17: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा अंतिम आठवडा लवकरच सुरू होणार आहे. सध्या या पर्वाचा शेवटचा वीकेंडचा वार सुरू आहे. हा वीकेंड घरात असलेल्या सदस्यांच्या नातेवाईकांबरोबर रंगला आहे. पण लाइव्ह परफॉर्मन्सनंतर घरात वाइल्ड कार्ड म्हणून आलेली आयशा खान शो बाहेर झाली आहे.
अलीकडेच ‘बिग बॉस’मध्ये प्रेक्षक गेले होते; ज्यांच्यासमोर घरातील सदस्यांनी लाइव्ह परफॉर्मस केला. यावेळी घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांना रोस्टिंग केलं. ज्यानंतर ‘बिग बॉस’मध्ये गेलेल्या प्रेक्षकांनी अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविया आणि आयरा खान यापैकी एका सदस्याला घराबाहेर केलं. आयशा खान प्रेक्षकांच्या बहुमताने काल शो बाहेर पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत, आयशा घराबाहेर होताना सर्व सदस्यांना भेटताना दिसत आहे. यावेळी अंकिता भावूक झालेली पाहायला मिळत आहे. तर विक्की आयशाला मिठी मारून कुटुंबीयांची काळजी घे, असं सांगताना दिसत आहे. तसेच इतर सदस्य देखील आयशाला निरोप देताना पाहायला मिळत आहे. यावेळी मनारा आयशाला म्हणते, “लवकरच तुझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला हैदाराबादमध्ये भेटू.” यानंतर आयशा मुनव्वरशी हात मिळवणी करत म्हणते की, इथेच प्रवास संपला. हे ऐकून मुनव्वर जास्त काही न बोलता तिला निरोप देताना दिसत आहे.
दरम्यान, अंतिम आठवड्यात मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, अरुण माशेट्टी यांच्याबरोबर आता अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविया पोहोचली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस १७’ या पर्वाचे टॉप-५ सदस्य कोण असणार? आणि ट्रॉफीवर नावं कोण कोरणार? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.