‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा प्रवास आता संपणार आहे. आज या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. हा सोहळा सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहे. तब्बल सहा तासांच्या या सोहळ्यानंतर रात्री १२ वाजता ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विजेत्याच्या बाबतीत सोशल मीडियावर अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. अशातच दुसऱ्याबाजूला मुनव्वर फारुकची कथित गर्लफ्रेंड व ‘बिग बॉस १७’ची सदस्य आयशा खान चर्चेत आली आहे. वयाच्या ९व्या वर्षी तिच्यावर विनयभंग झाल्याचा खुलासा आयशाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला आहे.
सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला आयशा खानने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने विनयभंगाचा धक्कादायक प्रसंग सांगितला. आयशाने सांगितलं, “मला कोणीतरी आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं आणि म्हणाली, हा काका बोला. ते म्हणाले, इकडे ये. त्यानंतर त्यांनी मला एक पत्ता विचारला. मी सांगितलं, हो मला माहित आहे. या बिल्डिंगमध्ये आहे. ते बोलले, मला घेऊन जातेस का? मी म्हणाले, ठीक आहे, चला. मी त्यांना घेऊन गेले. जेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली उतर होतो, तेव्हा त्यांनी मला अचानक पायऱ्यांवरून ढकललं. त्यामुळे मी पडले.”
हेही वाचा – Video: संकर्षण कऱ्हाडेने शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ धाडसी निर्णयाचं केलं कौतुक, म्हणाला…
“यानंतर त्यांना मला जे काही करायचं होतं ते करू लागले. मला काहीच कळतंच नव्हतं, हे काय होतंय. पण एवढं समजत होतं की, जे काही होतंय ते चुकीचं होत आहे. ९ वर्षाच्या मुलीला एवढं काय समजेल? मी ओरडू शकत नव्हते. कारण माझ्या तोंडावर त्यांनी हात ठेवला होता. मी फक्त त्यांना एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत होती की, माझी आई तिकडे उभी आहे. मला जाऊ द्या. पण त्यांनी मला सोडलं नाही. ईश्वराच्या कृपेने पुढे त्यांनी मला १० मिनिट तिथेच थांबायला सांगितलं आणि ते निघून गेले. जसं मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं तसं माझ्या डोक्यात आलं, आता इथून पळा,” आयशा हा प्रसंग सांगताना रडत होती. हा प्रसंग ऐकून सिद्धार्थ कननला देखील अश्रू अनावर झाले.
दरम्यान, आयशा खानने ‘बिग बॉस १७’मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश घेतला होता. पण रोस्टिंग टास्कनंतर २० जानेवारीला आयशा शो बाहेर झाली.