Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात वाइल्ड कार्ड म्हणून आलेली सदस्य आयशा खान आता घराबाहेर झाली आहे. मुनव्वर फारुकीची पोलखोल करणारी आयशा अंतिम आठवडा सुरू होण्यापूर्वीच बेघर झाली आहे. पण घराबाहेर येताच आयशाने मुनव्वर फारुकीवर पुन्हा निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या लाइव्ह परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांच्या मतानुसार आयशा खान ‘बिग बॉस १७’मधून बाहेर झाली आहे. तिच्याबरोबर अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविया नॉमिनेट होते. लाइव्ह परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांनी या चौघांमधून आयशाला घराबाहेर जाण्यासाठी मतं दिली. त्यानंतर आयशा घरातील सदस्यांना निरोप देत बाहेर पडली. यावेळी ती मुनव्वरला जाता जाता म्हणाली, “इथेच प्रवास संपला.” आयशाने शोमधून बाहेर येताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचा संबंध मुनव्वर फारुकीशी असल्याचं बिग बॉसचे चाहते म्हणतं आहेत.
आयशाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “हा एक कठीण प्रवास आहे. ज्यामध्ये चढ-उतार येतात. पण तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा पाहून मी खूप आनंदी आहे. हा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता. तुमच्या प्रेमासाठी ऋणी आणि सदैव कृतज्ञ आहे. तुमच्या हातात माझं आयुष्य आहे, मला फक्त प्रेम पाहिजे आणि हा…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खूप सारं प्रेम – आयशा खान”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा २८ जानेवारीला असणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.