छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो ‘बिग बॉस १७’ चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वीच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. कॉमेडियन मुन्नवर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला. तर अभिषेक कुमारने उपविजेतेपदावर नाव कोरले. महाअंतिम सोहळ्यात मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा यांच्यात अटीतटीचा सामना रंगल्याचे पहायला मिळाले. अनेकांना अंकिता बिग बॉसचे विजेतपद पटकावले अशी अपेक्षा होती मात्र, अखेर मुनव्वरने बिग बॉस १७’ विजेतेपदावर आपले नाव कोरले.
‘बिग बॉस १७’ चा सीझन यशस्वीरित्या पार पडल्यामुळे निर्मात्यांकडून नुकतेच एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बिग बॉस १७’ मधील सगळ्या स्पर्धकांनी हजेरी लावली होती. यावेळी अरबाज खानने त्याची पत्नी शूराबरोबर या पार्टीत हजेरी लावली होती. दरम्यान या पार्टीतील इनसाईट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये स्पर्धेक पार्टीत धमाल मस्ती करताना दिसत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन केक कट केला. त्यानंतर अनेकांनी भन्नाट डान्सही केला. बिग बॉसच्या घरात हाणामारी करणारे स्पर्धकही या पार्टीत एकमेकांशी हसत खेळत बोलताना दिसले. दरम्यान मुन्नवर फारुकीने डोक्यावर बॉटल घेऊन बॉबी देओलच्या जमाल कुडु गाण्याची हूक स्टेपही केली. तर अंकिता व विकीच्या डान्सनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
या पार्टीत चर्चेचा विषय ठरला तो सदस्यांचा लूक विकी जैनपासून मनारा चोप्रापर्यंत प्रत्येकाने परिधान केलेल्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी हटके कपडे परिधान करत फोटोही काढले. या पार्टीतील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.