टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा शो त्याच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचाला आहे. बिग बॉस १७ चे विजेतेपद मिळवण्यासाठी मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, इशा मालवीय, अंकिता लोखंडे, विकी जैन यांच्या जोरदार स्पर्धा सुर असल्याचे बघायला मिळत आहे.
दरम्यान फॅमिली वीक’ टास्कदरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटंबातील सदस्य भेटायला आले होते. विकीची आई आपला मुलगा व सून अंकिताला भेटण्यासाठी आल्या होत्या. या भेटीदरम्यान अंकिता व विकीच्या आईमध्ये खटकेही उडालेले बघायला मिळाले होते. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांनी विकीच्या आईला ट्रोलही केले होते. अशातच विकीच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या “अंकिता या इंडस्ट्रीमध्ये १७ वर्षांपासून काम करत आहे. आपल्यापेक्षा छोट्या लोकांना तिने जिंकू दिलं तर काय फरक पडतो?” असे म्हणताना दिसत आहे.
आता अंकिताच्या सासूच्या या व्हिडीओवर अभिनेत्री कंगना राणौतने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर अंकिताच्या सासूचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने “मीडिया तुमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंकिताची सासू तिला कशी मदत करते, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. रिएलिटी शो येतील आणि जातील…पण, कुटुंब कायम सोबत असतं. मला वाटतं अंकिताने हा शो जिंकावा. पण, यासाठी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याची किंमत मोजावी लागू नये.” असे कॅप्शनही दिले आहे.
कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेट केल्या आहेत. कंगना व अंकिताने मणकर्णिका चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघींमध्ये खास बॉन्डिंग तयार झाले आहे. अंकिता व विकीच्या लग्नालाही कंगनाने हजेरी लावली होती.