Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’चं १७वं पर्व आता शेवटच्या टप्यात येऊन पोहोचलं आहे. लवकरच अंतिम आठवडा सुरू होणार आहे. सध्या या पर्वाचा शेवटचा वीकेंडचा वार सुरू आहे. या वीकेंडच्या वारसाठी घरातील सदस्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आलं असून त्यांची मत जाणून घेतली जात आहेत. काल सलमान खानने सदस्यांच्या नातेवाईकांना अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान मन्नारा चोप्राची बहीण मिताली हांडाने अंकिता लोखंडेची अक्षरशः पोलखोल केली. मितालीने एक अशी गोष्ट सांगितली, जी शोमध्ये दाखवण्यात आली नव्हती. पण ‘बिग बॉस’च्या २४ तास लाइव्हमध्ये ती पाहायला मिळाली होती.
काल वीकेंडच्या वारला सलमान खानने अंकिता लोखंडे आणि इशा मालवियाला मन्नाराच्या व्यक्तिरेखीची खिल्ली उडवल्यावरून चांगलंच फटकारलं. यानंतर मिताली हांडाने अंकितावर मेंटल टॉर्चरचा आरोप लावला. मितालीचं हे बोलणं ऐकून सुरुवातीला सलमानला वाटलं की, ती इशाबद्दल बोलत आहे. त्यामुळे सलमान म्हणाला, “इशाबद्दल आपण नंतर बोलू.” पण मिताली म्हणाली, “इशा नाही. ही गोष्ट अंकिताबद्दल आहे. लाइव्ह फीडमध्ये अंकिता-विक्कीसह चार लोक होते. ते मन्नारा आणि मन्नाराच्या आईची नक्कल करत होते. यावेळी अंकिता मन्नाराला सावत्र मुलगी असल्याचं बोलताना दिसली.” मिताली सांगितलेली ही गोष्ट ऐकून अंकिता, इशाने फेटाळून लावली. अंकिता म्हणाली, “ही काहीतरी वेगळं पाहून आलीये.” पण मितालीचा आरोप व दावा खरा होता. याचा व्हिडीओ ‘बिग बॉस’च्या ७व्या पर्वातील सदस्य अंडी कुमारने शेअर केला आहे.
अंडीने ‘एक्स’वर अंकिता, विक्की, आयशा व इशाचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आयशा आणि इशा मन्नारा व मन्नाराच्या आईची नक्कल करताना दिसत आहेत. तर अंकिता-विक्की बेडवर झोपून खिल्ली उडवतं आहेत. यावेळीच अंकिता मन्नाराला सावत्र मुलगी म्हणताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भातील सध्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अंकिताला प्रेक्षकांनी याप्रकरणावरून चांगलंच ट्रोल केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये सध्या मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी यांच्याबरोबर आता अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविया हे सदस्य राहिले आहेत. पण आज आणखी सदस्य बेघर होणार असून कोणते सदस्य अंतिम आठवड्यात जातात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.