टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस हा शो रंगतदार होताना दिसत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घऱात अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैनमध्ये सतत वाद होताना दिसत आहेत. बिग बॉसमध्ये आल्यापासून दोघांमध्ये भांडणे सुरू आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात फॅमिली वीकमध्ये अंकिताची सासू ‘बिग बॉस’च्या घरात येऊन गेली, तेव्हापासून दोघांमधील भांडणे आणखीनच वाढल्याचे बघायला मिळाले आहे.
बिग बॉसच्या घरात वादादरम्यान अंकिताने विकीला लाथ मारली होती. अंकिताच्या या प्रकारामुळे विकीचे आई-वडील खूप चिडले. या घटनेनंतर विकीच्या वडिलांनी थेट अंकिताच्या आईला फोन करून नाराजी व्यक्त केली होती. खुद्द विकीच्या आईनेच अंकिताजवळ याबाबतचा खुलासा केला होता. या प्रकारामुळे अंकिता खूप दु:खी झाल्याचे बघायला मिळाले होते.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर रितेश देशमुखपासून रश्मी देसाईपर्यंत अनेक कलाकारांनी अंकिताला पाठिंबा देत तिच्या सासूवर टीका केली होती. आता बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनेही अंकिताला पाठिंबा दर्शवला आहे. सनी लिओनीने अंकितासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “बिग बॉस १७ च्या अंतिम फेरीसाठी अंकिता लोखंडेला शुभेच्छा. मी तुझ्या पाठिशी उभी आहे.” या पोस्टबरोबर तिने #AnkitaIsTheBoss हा हॅशटॅगही वापरला आहे. सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर २०२१ साली अंकिताने विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र, बिग बॉसमधील वादांमुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताने अनेकदा विकीबरोबर नाते तोडण्याबाबतही भाष्य केले आहे. त्यामुळे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर विकी व अंकिता आपल्या नात्याबद्दल काय निर्णय घेतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.