‘बिग बॉस’चा १७ वा सीझन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. उद्या (ता. २८ जानेवारी) ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आकर्षण होते ते विनिंग ट्रॉफीचे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनच्या ट्रॉफीमध्ये बदल झालेला बघण्यात आला आहे. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वाची ट्रॉफी नेमकी कशी असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. दरम्यान, यंदाची ट्रॉफीही खूपच वेगळी आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या यंदाच्या ट्रॉफीची झलक पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बिग बॉसच्या घरात असणाऱ्या तीन मोहल्ल्यांच्या दरवाजांच्या प्रतिकृतीचा समावेश आहे. सोनेरी रंगाची ही ट्रॉफी आता कोणाला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बिग बॉस जिंकणार कोण?
‘बिग बॉस’च्या घरातून विकी जैन बाहेर पडल्यानंतर अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण माशेट्टी हे ‘सर्वोत्तम ५‘मध्ये दाखल झाले. जिओ सिनेमावर या पाच जणांसाठी मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊ शकतात. दरम्यान, या पाचही जणांमध्ये कोणता स्पर्धक आघाडीवर आहे याबाबतची माहिती समोर आली आहे. व्होटिंग ट्रेंडनुसार मुनव्वर फारुकी सध्या टॉपवर असून, अंकिता व अभिषेक कुमार ‘बॉटम २‘मध्ये आहेत.
‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा कुठे पाहता येणार
उद्या म्हणजे रविवारी (ता. २८ जानेवारी) संध्याकाळी ६ वाजल्यापासून बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेला सुरुवात होणार आहे. कलर्स चॅनेलवर हा सोहळा तुम्ही पाहू शकता. संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल सहा तास हा सोहळा रंगणार आहे. कलर्स चॅनेलबरोबर प्रेक्षक जिओ सिनेमावरही बिग बॉसचा हा महाअंतिम सोहळा बघू शकतात.