Bigg Boss 17 Updates: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची महाअंतिम फेरी २८ जानेवारी होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. नुकताच समर्थ जुरेल या घरातून बाहेर पडला. त्यामुळे सध्या घरात ८ सदस्य बाकी आहेत. अंकिता लोखंडे, विक्की जैन, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, इशा मालविया, आयशा खान, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार या आठ सदस्यांमधील चार सदस्य आता फिनाले वीकसाठी (अंतिम आठवड्यासाठी) निवडले गेले आहेत.
नुकताच नॉमिनेशन स्पेशल टास्क झाला. ज्यामध्ये घरातील आठ सदस्यांमध्ये दोन टीम केल्या गेल्या. ‘ए टीम’मध्ये मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण आणि ‘बी टीम’मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि इशा अशा दोन टीम करण्यात आल्या. यावेळी विरोधी गटातील सदस्यांना टॉर्चर करून त्यांना नॉमिनेट करायचं होतं. ‘बी टॉम’ने १६ जानेवारीला परफॉर्म केलं. यावेळी अंकिता अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स करताना दिसली. तर आयशा मन्नाराच्या चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकताना पाहायला मिळाली. अशा अनेक रणनीती आखून ‘ए टीम’ला टॉर्चर करण्यात आलं. पण बराच काळ मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण दिलेल्या जागेवर तग धरून उभे होते. पण काही वेळानंतर त्यांनी दिलेली जागा सोडली. त्यानंतर काल ‘ए टीम’ ‘बी टीम’ला टॉर्चर करणार होती. पण त्यापूर्वीच ‘बी टीम’ घरातील सामान लपवताना पाहायला मिळाले. याच दरम्यान विक्की व मुनव्वरमध्ये मोठी भांडणं झाली. त्यानंतर ‘बिग बॉस’ने मात्र गेम पालटला.
विक्की व मुनव्वरच्या भांडणानंतर ‘बिग बॉस’ने ‘टीम ए’ला आर्काइव रुममध्ये बोलावलं. ‘बी टीम’ने टास्कपूर्वी कशा प्रकारे घरातील सामान लपवलं हे दाखवलं. महाअंतिम फेरी जवळ येत असताना अशाप्रकारे खेळणं चुकीचं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने ‘टीम ए’ला एक संधी दिली. ‘टीम बी’चा बदला घेण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘टीम ए’ला दोन पर्याय दिले. एक- ‘टीम बी’ला २८ मिनिटांत आउट करने. दोन- ‘टीम बी’मधील सगळ्यांना अपात्र ठरवणे आणि नॉमिनेट करणे. बिग बॉसने दिलेल्या पर्यायानंतर ‘टीम ए’मधील सदस्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या पर्याय निवडून ‘टीम बी’मधील सदस्यांना या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट केलं. यामुळेच ‘ए टीम’ मधील सदस्य म्हणजेच मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण थेट फिनाले वीकसाठी निवडले गेले. तर अंकिता, विक्की, इशा आणि आयशा या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले.
हेही वाचा – सई लोकूरच्या मुलीच्या नावाचं सिक्कीमशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या काय आहे अर्थ?
आता नॉमिनेट झालेले सर्व सदस्य फिनाले वीकमध्ये पोहोचण्यासाठी लढताना दिसणार आहेत. त्यामुळे अंकिता, विक्की, इशा आणि आयशा या चार सदस्यांपैकी कोण फिनाले वीकमध्ये पोहोचतंय, हे पाहणं उत्कंठावर्धन असणार आहे.