‘बिग बॉस’चा १७ वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २८ जानेवारीला ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या प्रेक्षकांना प्रत्येक भागात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात विकी जैन आणि अंकिता लोखंडेमध्ये पहिल्या दिवसापासून टोकाचे वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शोमध्ये आलेल्या अंकिताच्या सासूने सूनेच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता नुकत्याच एका भागात अंकिताची आई व जाऊबाईंनी हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानने या दोघींना अंकिता-विकीच्या खेळाबद्दल विचारलं.
सलमान खानने यावेळी अंकिता लोखंडेच्या आईला, “विकीच्या आईचा त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता का? त्या असं का म्हणाल्या” याबद्दल विचारलं. यावर “ही गोष्टी त्या का बोलल्या असतील? मला स्वत:ला आश्चर्य वाटलं होतं.” असं अंकिताच्या आईने सलमानला सांगितलं. तसेच अभिनेत्रीच्या जाऊबाई रेशू जैन याबद्दल म्हणाल्या, “हो, आमच्या सासूबाईंनी ते अत्यंच चुकीचं विधान केलं.”
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’च्या शूटिंगसाठी माथेरानला पोहोचली जुई गडकरी! ‘ते’ दृश्य पाहून केली पर्यटकांची कानउघडणी
पुढे सलमान खानने रेशू जैन यांना, “अंकिता-विकीच्या नात्यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे?” असं विचारलं. यावर त्या म्हणाल्या, “काही गोष्टी टीव्हीवर खरंच खूप चुकीच्या दिसत आहेत. ज्या पाहायला अपमानास्पद वाटतात…दोघंही एकदम चुकीचं आणि जरा जास्तच आगाऊपणे वागत आहेत. या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत.”
याशिवाय विकीच्या आईने नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या मुलाने अंकितासाठी पैसे खर्च केल्याचं सांगितलं होतं. ही गोष्ट देखील सलमान खानला अजिबात पटलेली नव्हती. त्यामुळे यावर “अंकिता एक स्वतंत्र स्त्री आहे आणि खूप चांगली लोकप्रिय अभिनेत्री आहे. एक पती म्हणून बायकोला हवं नको ते पाहणं ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे.” असं मत सलमान खानने मांडलं.
दरम्यान, यावेळी ‘बिग बॉस १७’च्या रंगमंचावर अनिल कपूर (फायटर), शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन (तेरी बातों में ऐसा उल्झा जिया) यांनी देखील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.