‘बिग बॉस १७’ चं विजेतेपद स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने पटकावलं आहे. या पर्वातील सर्व स्पर्धकांना हरवत बिग बॉस १७ची ट्रॉफी, ५० लाख रुपये प्राईज मनी तसेच नवी कोरी कार त्याने आपल्या नावावर केली आहे. बिग बॉसच्या घरात लाखो रुपये कमावणाऱ्या मुनव्वर फारुकीची संपत्ती किती आहे, ते जाणून घेऊयात.
‘टाईम्स नाउ’च्या माहितीनुसार मुनव्वर फारूकीची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये आहे. स्टँड-अप कॉमेडी शो, म्यूजिक अल्बम, रिअॅलिटी शो आणि विविध ब्रँडच्या जाहिराती करून मुनव्वर पैसे कमावतो. मुनव्वरच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास तो एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याच्या प्रत्येक स्टँडअप कॉमेडी शोमधून तो १.५ लाख ते २.५ लाख रुपये कमावतो.
इन्स्टाग्रामवर मुनव्वर फारुकीचे १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. स्पॉन्सर्ड पोस्टसाठी तो जवळजवळ १५ लाख रुपये आकारतो. ‘बिग बॉस १७’ साठी मुनव्वर फारुकीचं मानधन प्रति आठवड्याला ७ लाख ते ८ लाख रुपये इतकं होतं. मुनव्वर १२ आठवडे बिग बॉसच्या घरात राहिला. म्हणजेच त्याला शोसाठी ८४ लाख ते ९६ लाखापर्यंत मानधन मिळालं. ते पैसे व ५० लाखांच्या बक्षीस रकमेसह त्याने या एकट्या शोमधून जवळपास १.३४ कोटी ते १.४६ कोटी रुपयेही कमावले आहेत.
मुनव्वरच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर त्याच्याजवळ महिंद्रा स्कॉर्पियो, एमजी हेक्टर आणि टोयोटा फॉर्च्यूनर या गाड्या आहेत आणि आता बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यावर या कलेक्शनमध्ये ह्युंदई क्रेटाची भर पडली आहे.
दरम्यान मुनव्वर आपली विजेतापदाची ट्रॉफी घेऊन डोंगरीत परतला आहे. चाहत्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. डोंगरीत मुनव्वरच्या भेटीसाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जागोजागी मुनव्वरचे फलकही लावण्यात आले होते.