वकील गुणरत्न सदावर्ते मागील १० दिवसांपासून बिग बॉस १८ मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. मात्र त्यांना १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिग बॉस च्या घरातून बाहेर काढण्यात आलं. घरातील सर्वाधिक सक्रिय सदस्यांपैकी एक असलेल्या गुणरत्न सदावर्तेंना घराबाहेर का काढलं, ते शोमध्ये परत येतील की नाही ते जाणून घेऊयात.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भातील एका प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सोमवारी पार पडली होती. त्यादिवशी सदावर्ते शोमध्ये असल्याने कोर्टात हजर राहू शकले नाही, त्यामुळे न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. सदावर्तेंच्या गैरहजेरीत या प्रकरणाच्या सुनावणीत अडचण येत असल्याने त्यांची पत्नी आणि टीमने त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात यावं, अशी मागणी केली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते मंगळवारी (१५ ऑक्टोबरला) बिग बॉसच्या घराबाहेर पडले.

या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् वेब सीरिजची यादी

“ते सोमवारी घराबाहेर पडले आणि लवकरच संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. त्यांना घरामध्ये परत यायचं आहे. तसेच ज्या प्रकारे ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे हे पाहता, निर्मातेही त्यांना शोमध्ये परत आणण्याचा विचार करत आहेत, मात्र सदावर्ते बिग बॉसमध्ये परतणार की नाही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही,” अशी माहिती इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

गुणरत्न सदावर्ते यांचं कोर्टातील प्रकरण काय?

गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील काही याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. मात्र मुख्य याचिकाकर्ते सदावर्ते या सुनावणीला उपस्थित नव्हते. या सुनावणीला ते गैरहजर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीत महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ महाराष्ट्र सरकारची बाजू मांडतील. तसेच पुढील सुनावणीदरम्यान कोणत्याही याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही खंडपीठाने स्पष्ट केलंय.