Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जोरदार सुरू आहे. या पर्वातील १८ सदस्यांनी पहिल्या दिवसापासून घरात गोंधळ घातला आहे. कोणी जेवणाच्या हिस्सावरून भांडतंय तर कोणी बेडवरून भांडताना दिसत आहे. नुकताच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पहिला वीकेंडचा वार पार पडला. या पहिल्या वीकेंडच्या वारला सलमान खानने न दिसलेल्या सदस्यांचे डोळे उघडले. तसंच रविवारी ‘लाफ्टर शेफ्स’ आणि ‘बिग बॉस’चा महासंगम होता. यावेळी ‘लाफ्टर शेफ्स’मधील कलाकारांनी सलमान खानसह घरातील सदस्यांबरोबर खेळ खेळले. यादरम्यान सलमानने काही सदस्यांचं कौतुक केलं. त्यापैकी एक म्हणजे गुणरत्न सदावर्ते.
पहिल्या दिवशी कोणाशीही जास्त संवाद न साधणारे गुणरत्न सदावर्ते यांचा दुसऱ्या दिवसापासून वेगळाच आणि हटके अंदाज पाहायला मिळाला. लाखोंचा हिरेजडीत सूट घालून कधी नाचताना दिसले, तर कधी जोरजोरात हसताना दिसले. त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजाने अनेकांची मनं जिंकली. एवढंच नव्हे तर बॉलीवूड कलाकार देखील त्यांच्या स्टाइलवर फिदा झाले आहेत.
सलमान खानने वीकेंडच्या वारच्या सुरुवातीला गुणरत्न सदावर्तेंचं कौतुक केलं. पण सध्या चर्चेत असलेले सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे. दुसऱ्याच आठवड्यात गुणरत्न सदावर्तेंना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण वादग्रस्त विधान नाही तर मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित केस आहे.
‘टाइम्स नाउ’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित केसमुळे गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढलं आहे. पण ते पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्याप्रकरणी सुनावणी बाकी आहे. त्यामुळेच सदावर्तेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या जजने गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस १८’मध्ये असल्यावरून नाराजी व्यक्त केली. जज म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस १८’मध्ये आहेत. याबाबत न्यायालयात नाराजी जाहीर करत आहे. तसंच याप्रकरणाची सुनावणी १९ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.”
….. #GunaratnaSadavarte Become
— ᴹᵉᵈⁱᵗᵃᵗⁱᵒⁿ (@IMMeditationn) October 14, 2024
Naseeruddin Shah 2.0 ????#KaranveerMehra #BiggBoss18 pic.twitter.com/vddxeK4BXg
दरम्यान, पहिल्या आठवड्यात १८ सदस्यांना एलिमिनेशनपासून दिलासा मिळाला. कारण १९वा सदस्य म्हणून ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेलं गाढव बाहेर काढण्यात आलं.