Bigg Boss 18 Grand Finale : ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड फिनालेला यंदा ‘स्काय फोर्स’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार उपस्थित राहणार होता. मात्र, प्रत्यक्ष मंचावर प्रेक्षकांना फक्त सलमान आणि वीर पहारिया एकत्र दिसले. फिनालेसाठी अक्षय कुमार विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार होता. पण, समोर आलेल्या वृत्तांनुसार, हा बहुप्रतीक्षित सेगमेंट नियोजित वेळेनुसार झाला नाही.

अक्षय कुमार सलमानसह ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचा प्रमोशन सेगमेंट शूट करण्यासाठी सेटवर वेळेत उपस्थित राहिला होता. अक्षय कुमार त्याच्या वक्तशीरपणासाठी ओळखला जातो. मात्र, सलमान खानला सेटवर येण्यास उशीर झाल्याने अक्षय अखेर सेगमेंट शूट न करताच निघून गेला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानबरोबर शूटिंग करण्यासाठी खिलाडी कुमार दुपारी बरोबर २:१५ वाजता ‘बिग बॉस १८’च्या सेटवर पोहोचला होता. तथापि, एक तासाहून अधिक वाट पाहिल्यानंतर, इतर कामांमुळे अक्षयने सेट सोडण्याचा निर्णय घेतला.

Bigg Boss 18 – दोघांमध्ये काय चर्चा झाली?

सलमान खान संध्याकाळी ६:३० वाजता सेटवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, अक्षय आणि सलमान यांनी एकमेकांशी फोनवर बोलणं केलं असून भविष्यात एखाद्या कार्यक्रमाला एकत्र येऊ अशी चर्चा दोघांमध्ये झालेली आहे.

अक्षय कुमार सेटवर उपस्थित नसला तरी, या सलमानसह शूटिंग करण्यासाठी अक्षयचा ‘स्काय फोर्स’मधील सह-कलाकार आणि नवोदित अभिनेता वीर पहारिया ‘बिग बॉस’च्या मंचावर उपस्थित राहिला होता.

दरम्यान, ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा येत्या २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय आणि वीर पहारिया यांच्यासह सारा अली खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader