Bigg Boss 18: २०२५ या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘बिग बॉस १८’च्या घरात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने खास पाहुण्यांनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री कंगना रनौत, भारती सिंह, करण कुंद्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि समर्थ जुरेल यांच्याबरोबर टॉप-१० सदस्यांनी नवं वर्षाचं स्वागत केलं. ३१ डिसेंबरच्या भागात ज्योतिषीदेखील आले होते. त्यांनी टॉप-१० सदस्यांना हटके नावं देत, त्यांची भविष्यवाणी सांगितली.
ज्योतिषी प्रदीप किराडू ‘बिग बॉस’च्या घरात आले होते. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच शिल्पा शिरोडकरची भविष्यवाणी सांगितली. शिल्पाला त्यांनी ‘मशिन’ असं नावं देऊन सांगितलं की, तू तुझं आयुष्य मुलं आणि कुटुंब सुधारण्यासाठी लावतं आहेस, हे करू नकोस. ते स्वतःचं आयुष्य, ग्रह ते स्वतः घेऊन आले आहेत. येणारे तीन-चार वर्ष तुझ्यासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे जोरात कामाला लाग. अभिनय क्षेत्रात पुन्हा कामाला सुरुवात कर. त्यानंतर चाहत पांडेची भविष्यवाणी सांगितली. तिला ‘गाय’ असं नावं दिलं होतं. ज्योतिषी प्रदीप म्हणाले, “गाय दोन प्रकारे असतात. एक शिंगवाली आणि दुसरी शिंग नसलेली गाय. तू शिंग असलेली गाय आहेस. दिवसभर इकडे तिकडे फिरणार आणि त्यानंतर दूध दुसरंच कोणीतरी काढून नेणार. अशा प्रकारे इकडे-तिकडे भटकणं बंद कर. तू जास्त विचार करते. हा जास्त विचार केल्याने नेहमी काही वाईट होतं. चांगलं होतं नाही. २०२५-२६मध्ये तुझ्या लग्नाचा योग आहे.”
करणवीर मेहराला लग्न न करण्याचा दिला सल्ला
पुढे करणवीर मेहराला ‘चाणक्य’ नाव देत प्रदीप किराडू म्हणाले, “हा खूप हुशार माणूस आहे. तो डोकं इतकं लावतो की कोणीही समजू शकत नाही. कोणाला बघेल आणि कोणाला मारले हे समजणार पण नाही. जर याची सटकली ना, तर इतकं प्रेमाने मारेल की समोरच्याला कळणार पण नाही.” त्यानंतर ज्योतिषींनी करणला लग्न न करण्याचा सल्ला दिला. म्हणाले, “लग्न करू नकोस. करशील आणि फसशील. तुझ्यापासून कोणतीही मुलगी आनंदी राहू शकत नाही. जर कोणत्या मुलीला करण आवडत असेल तर आताच डोक्यातून काढून टाका. याला दूर ठेवा. अशा कुंडलीमध्ये मुलगी येऊ शकत नाही जरी आली तरी निघून जाईल आणि अशा प्रकारे निघून जाईल की आयुष्यात पुन्हा चेहरादेखील पाहणार नाही. तसंच येणाऱ्या काळात तू चांगला राजकारणी बनू शकतोस.”
करणनंतर अविनाश मिश्राचं भविष्य सांगितलं. त्याला ‘राजा हरिश्चंद्र’ असं नाव दिलं होतं. ते म्हणाले की, राजा हरिश्चंद्र सत्य आणि प्रामाणिकपणामध्येच गेला. यामुळे ज्या वेगाने तू पुढे जायला पाहिजे तो वेग मंदावतो. शनिची महादशा असल्यामुळे खूप फायदेशीर आहे. येणारे साडे सात वर्षे तुझ्यासाठी सुवर्ण दिवस आहेत. फक्त प्रामाणिकपणा आणि गैरसमज यावर थोडा कंट्रोल कर. पटकन लग्न कर. जिच्याशी लग्न करशील तिला फक्त सुखी ठेव. पुढे रजत दलालला ‘राक्षस’ नाव देत ज्योतिषी म्हणाले, “मंगळचा प्रभाव जास्त असल्यामुळे तू राक्षससारखा बलवान आहेस. तुला कोणाच्या कानशिलात मारायला देखील भीती वाटतं नाही. तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू पाय तोडण्यास तयार होतोस. जोपर्यंत तू असा राहशील तोपर्यंत तुला काही समस्या नाही. पण जेव्हा तुझे कोणाबरोबर शाब्दिक वाद होतात तेव्हा ते तुझ्यासाठी विष असतं. बोलण्यावर लगाम ठेव.”
चुम दरांगला नाव दिलं ‘गाढव’
पुढे ज्योतिषींनी श्रुतिका अर्जुनला ‘सामान्य माणूस’ असं नावं दिलं. तिला म्हणाले की, सामान्य माणूस एक लॉलीपॉप घेतो आणि नुसता घोळत राहतो. जोपर्यंत लॉलीपॉप खात असतो तोपर्यंत त्या व्यक्तीला आपण खूप मोठं असल्याचं वाटतं. पण लॉलीपॉप संपल्यावर पुन्हा शून्यावर येतो. खूप भावनिक आहेस. दोन मिनिटांत रडतेस. मग चुम दरांगचं भविष्य सांगितलं. तेव्हा ज्योतिषींनी तुला दिलेलं नाव सांगू की नको असं विचारलं. चुम म्हणाली, “मला चालेलं तुम्ही सांगा.” तर ज्योतिषींनी चुमला ‘गाढव’ असं नाव दिलं होतं. ते म्हणाले, “तू नंबर वन गाढव आहेस. गाढव दिवसभर मजुरी करून मालकाकडून शेवटी मार खातो. मग रडतो. मी आज इतकं कमी काम केलंय की मालक येऊन मारून गेला. त्यामुळे मेहनतीबरोबर फळ काय मिळेल याचा देखील विचार कर. २०२७ला लग्न कर.”
हेही वाचा – Bigg Boss 18: मुनव्वर फारुकीने रजत दलाल-करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा नवा प्रोमो
त्यानंतर विवियन डिसेनाने भविष्यवाणी ऐकण्यास मनाई केली. त्यामुळे प्रदीप किराडू यांनी फक्त नाव सांगत एक सल्ला दिला. विवियनला ‘लंबी रेस का घोडा’ असं नावं दिलं होतं आणि म्हणाले, फक्त आंधळेपणाने धावू नको. मग ईशा सिंहची भविष्यवाणी सांगितली. ‘स्वप्नातील राणी’ असं नाव तिला दिलं होतं. ते म्हणाले, “ही आपल्या स्वप्नात असते आणि अशा लोकांची स्वप्न पूर्णही होतात. त्यामुळे स्वप्न बघत राहा. जास्त मेहनत करू नकोस. अजून तुझी चांगली वेळ सुरू झालेली नाहीये.”
शेवटी कशिश कपूरची भविष्यवाणी सांगितली. कशिश कपूरला ‘कासव’ असं नावं देऊन ते म्हणाले की, कासव खूप समजूदार असतो. तो हळूहळू पुढे जातो. जर कासवाप्रमाणे चालशील तर जे काम करशील त्यात तू अव्वल स्थानावर असशील. जर मधेच ससा बनण्याचा प्रयत्न केलास तर तिथेच थांबशील. सतर्क करतो.