Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४वा आठवडा सुरू आहे. शेवटचा, १५वा आठवडा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता अंतिम आठवड्यापर्यंत कोण पोहोचतं आणि कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ट्रॉफी उचलतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण, विवियन डिसेना आणि चुम दरांगच्या एका निर्णयामुळे ‘बिग बॉस’ भडकलेले पाहायला मिळाले.
८, ९ जानेवारीला ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क पार पडला. पहिल्या ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क विवियन डिसेना आणि चुम दरांगने जिंकला. हा टास्क करण चुमसाठी खेळताना दिसला. त्यामुळे चुम ‘तिकीट टू फिनाले’च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. ९ जानेवारीच्या भागात ‘तिकीट टू फिनाले’चा अंतिम, म्हणजेच दुसरा टास्क पाहायला मिळाला. या टास्कमध्ये एक स्ट्रेचर देण्यात आलं होतं. या स्ट्रेचरमध्ये गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या छोट्या विटा जमा करायच्या होत्या. गोल्डन विटा विवियनच्या आणि सिल्व्हर विटा चुमच्या होत्या. त्यामुळे विवियन, चुमच्या समर्थकांना या विटा गोळा करून स्ट्रेचरमध्ये टाकायच्या होत्या. ते स्ट्रेचर एका बाजूला विवियन तर दुसऱ्या बाजूला चुमला पकडायचं होतं. स्ट्रेचरमध्ये ज्या रंगाच्या सर्वाधिक विटा असणार होत्या, तो सदस्य ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून शेवटचा ‘टाइम गॉड’ होणार होता.
हा टास्क पाळीचे दिवस असतानाही चुम दरांगने ज्या प्रकारे खेळला, त्यामुळे सध्या तिचं कौतुक होतं आहे. तसंच विवियनची आक्रमक वृत्ती पाहून सर्व प्रेक्षक हैराण झाले आहेत. त्याचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं. ‘तिकीट टू फिनाले’चा दुसरा टास्क विवियन जिंकला. पण, विवियनने ‘तिकीट टू फिनाले’ घेण्यास आणि शेवटचा ‘टाइम गॉड’ होण्यास नकार दिला. स्वतःच्या आक्रमक वृत्तीमुळे विवियनने हा मोठा निर्णय घेतला. ‘तिकीट टू फिनाले’ घेण्याची आणि शेवटचा ‘टाइम गॉड’ होण्यासाठी संधी चुम दरांगला दिली. पण, तिनेही हे स्वीकारलं नाही. कारण, तिला टास्क जिंकून ‘तिकीट टू फिनाले’ आणि शेवटचं ‘टाइम गॉड’ व्हायचं होतं. तिला अशा पद्धतीने ही संधी नको होती. त्यामुळे चुमने नकार दिला. विवियन आणि चुमच्या या निर्णयानंतर ‘बिग बॉस’ भडकले.
‘बिग बॉस’ म्हणाले की, कोणालाही याचं महत्त्व समजलेलं नाही. १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम आठवड्यात जाण्याचा टास्क रद्द झाल्याचं घोषित केलं आहे. आता कोणीही ‘टाइम गॉड’ होणार नाही. याबरोबरच तुमच्यामधील कोणीही अंतिम आठवड्यात पाऊल ठेवू शकणार नाही. अजूनही दुसऱ्यांसाठी खेळा.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारी होणार आहे. यासाठी अवघे नऊ दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजयी कोण होणार? याची चर्चा जोरदार सुरू आहे.