Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील चाहत पांडे सध्या नातेसंबंधामुळे खूप चर्चेत आली आहे. फॅमिली वीकमध्ये चाहत पांडेची आई भावना पांडे म्हणाल्या होत्या की, चाहतने कोणाला डेट केलं नाही आणि ती कोणाला डेट करणारही नाही. माझ्या इच्छेनुसार ती लग्न करेल. त्यावरून सलमान खानने चाहतचा एक फोटो दाखवून पोलखोल केली. या फोटोमध्ये चाहतच्या बाजूला एक केक होता. या केकवर ‘नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा…माझं प्रेम,’ असं लिहिलं होतं. शिवाय सलमानने चाहतचा बॉयफ्रेंड गुजराती असल्याची हिंट दिली होती. पण, चाहतने शेवटपर्यंत बॉयफ्रेंड नसल्याचं नाकारलं.
त्यानंतर चाहतची आई भावना पांडेने थेट ‘बिग बॉस’ला आव्हान दिलं. “जर ‘बिग बॉस’ने चाहतच्या बॉयफ्रेंडचा फोटो आणि नाव शोधून काढलं तर मी २१ लाखांचं बक्षीस देईल.” तेव्हापासून चाहतचे काही अभिनेत्यांबरोबर फोटो व्हायरल झाले आहेत. पण, चाहतने ‘बिग बॉस’च्या घरातच बॉयफ्रेंड असल्याचा खुलासा केला होता. एवढंच नव्हे तर साखरपुड्याची अंगठीदेखील दाखवली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये, चाहत आणि कशिश कपूर जेवताना दिसत आहेत. यावेळी चाहत कशिशला म्हणते की, तुला मी क्यूट व्यक्तीला बाहेर दाखवेन. हे ऐकतानाच कशिश खिल्ली उडवतं म्हणते, “शेवटी तुझ्या तोंडातून बाहेर आलंच ना.” त्यावर चाहत म्हणाली, “जाणूनबुजून बोलले. तुला सांगावंस वाटलं.” त्यानंतर चाहत नाटक करत हात पुढे आणते आणि कशिशला साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.
दरम्यान, ‘इंडिया फोरम्स’च्या वृत्तानुसार, चाहत पांडे एका अशा मुलाला डेट करत आहे, जो तिच्या जातीचा नाहीये. त्यामुळे चाहतच्या नात्याला तिच्या आईचा विरोध आहे. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी चाहतने एक पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये तिने डेट करत असलेल्या मुलाची आईबरोबर ओळख करून दिली होती. पण तिच्या आईने हे नातं स्वीकारण्यास नकार दिला. कारण चाहतच्या आईला त्यांच्यात जातीमधील मुलाबरोबर तिचं लग्न करायचं आहे. चाहत डेट करत असलेला मुलगा गुजराती आहे.