‘बिग बॉस’चं १८वं पर्व नुकतंच संपलं. १९ जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग आणि रजत दलाल हे सहा सदस्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. यामधील करणवीर मेहराने बाजी मारली. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीवर करणचं नाव कोरलं गेलं. पण, या पर्वात झळकलेल्या अभिनेत्रीने नुकताच मुंबईत घर शोधतानाचा धक्कादायक अनुभव सांगितला.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेली यामिनी मल्होत्राला मुंबईत घर शोधताना खडतर प्रवास करावा लागला. याबाबत तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला अनुभव शेअर केला आहे. तिची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.
यामिनी मल्होत्रा म्हणाली की, नमस्कार, मला तुम्हाला निराशाजनक घटना सांगायची आहे. जितकी मला मुंबई आवडते. तितकंच इथे घर शोधणं खूप कठीण आहे. मला अनेक प्रश्न विचारले गेले की, तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम?, गुजराती की मारवाडी? आणि मी एक अभिनेत्री आहे असं म्हणताच समोरून स्पष्टपणे नकार दिला जात होता. मी अभिनेत्री असल्यामुळे मी घरासाठी पात्र ठरतं नाही का? २०२५मध्ये अजूनही असे प्रश्न विचारले जात आहेत, हे धक्कादायक आहे. जर स्वप्न इथे अटींनुसार पूर्ण होतं असतील तर आपण याला खरंच स्वप्नांचं शहर म्हणू शकतो का?
यामिनी मल्होत्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने साकारलेली शिवानी चव्हाणची भूमिका खूप गाजली होती. पण काही काळानंतर यामिनीने ही मालिका सोडली. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर यामिनीने हिंदी टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ती वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून झळकली.
दरम्यान, यामिनी दाताची डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर आहे. तिने बऱ्याच जाहिराती, पंजाबी गाण्यांमध्ये काम केलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच तिचं ‘यामिनी मल्होत्रा वर्ल्ड’ नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. तिच्याकडे एकूण ४ कोटींची संपत्ती आहे.