‘बिग बॉस’चं १८वं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वात स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसांपासून वाद पाहायला मिळाले. हे पर्व १०० दिवसांचं नाहीतर १०५ दिवसांचं झालं होतं. या पर्वात दोन वेळा एका अभिनेत्रीने सलमान खानला लग्नाची मागणी घातली होती. याच अभिनेत्रीने नुकतीच आईसाठी आलिशान गाडी खरेदी केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असून अभिनेत्रीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सलमान खानला दोन वेळा लग्नाची मागणी घालणारी अभिनेत्री म्हणजे चाहत पांडे. चाहत पांडेने एका वीकेंड वारला आणि ‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याला सलमान खानला थेट लग्नाची मागणी घातली होती. याच चाहत पांडेने नुकतीच तिच्या आईला आलिशान गाडी गिफ्ट दिली. याचा व्हिडीओ चाहतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत तिच्या आईला शोरूमपर्यंत थाटात नेताना दिसत आहे. त्यानंतर जोरदार स्वागत करून आईला सरप्राइज देताना पाहायला मिळत आहे.
त्यानंतर चाहत आईबरोबर रिबन कापून गाडीची पूजा करताना दिसत आहे. मग चाहत आईला गुडघ्यावर बसून गाडीची चावी देत आहे. चाहत पांडेने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “एक स्वप्न पूर्ण झालं. मी माझ्या आईला नवीन गाडी गिफ्ट दिली. ज्या स्त्रीने मला सर्वस्व दिलं, तिच्यासाठी जे काही करू शकते ते कमीच आहे. तिच्याबरोबर हा क्षण शेअर करताना खरोखरच भाग्यवान वाटतं आहे.”
चाहत पांडेचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “चाहतसारखी मुलगी असणं हा आई-वडिलांसाठी एक आशीर्वाद आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुझ्यासारखी मुलगी असल्यामुळे तुझी आई खरंच नशीबवान आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांच्या पोटी जन्माला येवो.
माहितीनुसार, चाहत पांडेने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी २ लाख प्रत्येक आठवड्यासाठी मानधन घेतलं होतं. हिंदी टेलिव्हिजनवरील चाहत लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पवित्र बंधन’च्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कही’, ‘होशियारो’, ‘राधाकृष्ण’, ‘महाकाली’, ‘तेनाली राम’, ‘अलादीन-नाम तो सुना होगा’, ‘लाल इश्क’ अशा अनेक मालिकांमध्ये चाहत पांडेने काम केलं आहे.