Bigg Boss 18 Rajat Dalal On Karan Veer Mehra : रिअ‍ॅलिटी शोज आणि त्यासंबंधित अनेक वाद-विवाद हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांकडून याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसतात. काही जण म्हणतात की, हो रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात, तर काही जण हे असं काही नसतं असं सांगतात. निर्माते किंवा दिग्दर्शकांकडून तर कायमच हे दावे फेटाळण्यात येतात. ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोबद्दलही अशा अनेक चर्चा होताना दिसतात.

अशातच आता ‘हिंदी बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या १८ व्या पर्वातील रजत दलालने शोच्या विजेत्या करणवीर मेहराबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे रिअ‍ॅलिटी शो आणि याचे विजेते हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. १९ जानेवारी २०२५ रोजी, करणने हा शो जिंकला. त्यानंतर आता तीन महिन्यांनी रजतने शोच्या मतदानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचा असा विश्वास आहे की, करण मतांच्या आधारे विजयी झाला नाही, तर ते सॉफ्टवेअरमुळे झाले.

‘इनसाइडर विथ फैसू’शी झालेल्या संभाषणात, रजत दलालला विचारण्यात आले की, ‘करणवीर मेहरा जनतेच्या मतांच्या आधारे जिंकला असल्याचे त्याला वाटतं का?’ यावर रजतने उत्तर दिले की, “मतांच्या आधारे काहीही घडत असल्याचे मला जाणवले नाही. एक गोष्ट घडली पाहिजे, ती म्हणजे मतदान प्रामाणिकपणे झाले पाहिजे आणि प्रक्रिया योग्यरित्या पार पडली पाहिजे. काही सॉफ्टवेअर त्रुटी होती की आणखी काही. मला माहित नाही.”

यापुढे रजतने असं म्हटलं की, “पहिल्यांदा असं झालं आहे की, ‘बिग बॉस’ शो मतांच्या आधारावर नाही तर व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर जिंकला आहे. पत्रकार परिषदेत करणवीरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेली व्यक्ती जर स्वतः म्हणत असेल की, तो मतांच्या आधारे विजयी झाला नाही. आतल्या गोष्टी मला माहीत नाहीत. मला वाटतं की, विवियन डिसेना करणवीरपेक्षा जास्त जिंकण्यास पात्र होता. तो शोमध्ये माणूस म्हणून तसाच राहिला.”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाची चांगलीच चर्चा झाली होती. या पर्वात करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि रजत दलाल यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले होते. अखेर करणवीर मेहराने या शोचे विजेतेपद जिंकलं आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अशातच आता रजतने त्याच्या विजयाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.